विवाहितेचे मंगळसूत्र हिसकावले!
By admin | Published: June 20, 2016 01:51 AM2016-06-20T01:51:58+5:302016-06-20T01:51:58+5:30
वटपौर्णिमेची पूजा आटोपून घरी परतणा-या विवाहितचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याची घटना.
अकोला: वटपौर्णिमेची पूजा आटोपून घरी परतणार्या विवाहितेच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास कौलखेडमधील दत्त कॉलनीत घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. दत्त कॉलनीत राहणार्या वैशाली मोहोड (२८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी वटपौर्णिमा असल्याने त्या वडाची पूजा करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडल्या. वडाची पूजा आटोपल्यानंतर वैशाली मोहोड या घरी जाण्यासाठी निघाल्या असत्या, मागाहून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोन युवकांनी मोहोड यांच्या गळय़ातील २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मोहोड यांनी आरडाओरड करेपर्यंंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. मंगळसूत्रांची किंमत ६५ हजार रुपये आहे. गत काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढले असून, शहरामध्ये चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली. वटपौर्णिमा हा महिलांचा उत्सव असल्याने, रविवारी मोठय़ा संख्येने महिला वडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. घटनास्थळाला शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, ठाणेदार छगनराव इंगळे यांनी भेट दिली.