महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:19 PM2019-07-12T13:19:25+5:302019-07-12T13:21:18+5:30
अकोला: मनपातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा भंसाली यांची अविरोध निवड झाली.
अकोला: मनपातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा भंसाली यांची अविरोध निवड झाली. याव्यतिरिक्त झोन समिती सभापतींचीही निवड करण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे २१ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीमधील नऊपैकी आठ सदस्यांची निवड केल्यानंतर सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवारी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्यावतीने एकमेव मनीषा भंसाली यांचा अर्ज प्राप्त झाला. तसेच उपसभापती पदासाठी नगरसेविका जान्हवी डोंगरे यांचा अर्ज प्राप्त होता. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज नसल्यामुळे मनीषा भंसाली व जान्हवी डोंगरे यांची अविरोध निवड करण्यात आली. यासोबतच झोन समितीच्या सभापतींचीही अविरोध निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी आयुक्त संजय कापडणीस, नगरसचिव अनिल बिडवे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी, महापौर विजय अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महिला व बालकल्याण समितीमध्ये यांचा समावेश
महिला व बालकल्याण समितीमध्ये काँग्रेसने सदस्य पदासाठी नाव न दिल्यामुळे नऊपैकी आठ महिला सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये मनीषा भंसाली, सुनीता अग्रवाल, जान्हवी डोंगरे, मंगला म्हैसने, सोनी आहुजा, अनुराधा नावकार, उषा विरक व प्रमिला गीते यांचा समावेश आहे.
शिवसेनेला कोणते स्थान?
निधी वाटपाच्या मुद्यावर ८ जुलै रोजी भाजप व शिवसेनेची बैठक पार पडली होती. या बैठकीत केंद्रात व राज्यात भाजप-सेना युतीचे गोडवे गात सेना नगरसेवकांना समान निधी देण्यावर एकमत झाल्याची चर्चा होती. अर्थात, दोन्ही पक्षाकडून युतीची सबब पुढे केली जात असेल तर महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद, उपसभापती पद तर सोडाच शिवसेनेच्या वाटेला साधे झोन समितीचे सभापती पदही न आल्यामुळे मनपाच्या राजकारणात शिवसेनेचे नेमके कोणते स्थान आहे, असा सवाल शिवसैनिक उपस्थित करू लागले आहेत.