मनपात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:26+5:302021-05-22T04:17:26+5:30
अकोला: आगामी पावसाळ्यातील संभाव्य वादळवारा व नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. यादरम्यान ...
अकोला: आगामी पावसाळ्यातील संभाव्य वादळवारा व नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. यादरम्यान काही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे.
शहरात १८ मे रोजी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहराच्या विविध भागातील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांब वाकले आहेत. तसेच अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यामुळे शहराच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटाचा सामना करताना महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक झाली. या विभागातील आपत्ती निवारण कक्षाचे कामकाज कागदावर असल्याचे या निमित्ताने दिसून आले. दरम्यान, आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी मनपाच्या अग्निशमन विभागात आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित केला.
नागरिकांसाठी २४ तास सुविधा
नैसर्गिक संकट आल्यास नागरिकांना सोईचे व्हावे याकरिता हा विभाग २४ तास सुरू राहणार आहे. यासाठी दुरध्वनी क्रमांक 0724- 2434460 आणि टोल फ्री क्रमांक 18002335733 उपलब्ध करून देण्यात आला आहे.