मनपात खांदेपालट; उपायुक्त जावळेंकडे आर्थिक अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:33 AM2021-02-18T04:33:54+5:302021-02-18T04:33:54+5:30
महापालिकेत उपायुक्तांच्या दाेन रिक्त पदांपैकी एका पदासाठी शासनाने पंकज जावळे यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. जावळे यांनी उपायुक्तपदाचा पदभार ...
महापालिकेत उपायुक्तांच्या दाेन रिक्त पदांपैकी एका पदासाठी शासनाने पंकज जावळे यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. जावळे यांनी उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बुधवारी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी प्रशासकीय घडी बसविण्याचा प्रयत्न केला. प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची अतिरिक्त जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. आता ही जबाबदारी पंकज जावळे यांच्याकडे देण्यात आली. वैभव आवारे यांच्याकडे उपायुक्त विकासची धुरा देण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त पूनम कळंबे यांच्याकडील उपायुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी कमी करून त्यांच्याकडे पूर्व झाेनमध्ये क्षेत्रीय अधिकारी पदाची सूत्रे साेपविण्यात आली.
जलप्रदायची जबाबदारी ताठे यांच्याकडे!
मनपाच्या जलप्रदाय विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला हाेता. सुरेश हुंगे सेवानिवृत्त झाल्यामुळे ही दाेन्ही पदे रिक्त झाली. दरम्यान, जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक तुंबड्या भरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी चांगलाच दणका दिल्याचे समाेर आले. जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाची धुरा या विभागातील कंत्राटी उपअभियंता एच. जी. ताठे यांच्याकडे देण्यात आली.
‘या’ विभागाची विश्वासार्हता पणाला
मनपाच्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला केवळ हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांची देयके मंजूर करण्याची महत्त्वाची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. यामध्ये प्रामाणिकतेचा आव आणणाऱ्या एका लाेकप्रतिनिधीने माेलाची भूमिका बजावली. डाेक्यावर राजकारण्यांचा हात असल्यामुळेच हा कर्मचारी अधिनस्थ कनिष्ठ अभियंत्यांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याने या विभागाची विश्वासार्हता पणाला लागली आहे.