मनपात यशवंतराव चव्हाण जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:52+5:302021-03-13T04:34:52+5:30
विद्युत साहित्य लावलेच नाही! अकाेला: महापालिकेच्या सर्व विभागांमधील विद्युत साहित्य जुने झाले असून, त्यामुळे मनपाच्या वीज देयकांत वाढ झाली ...
विद्युत साहित्य लावलेच नाही!
अकाेला: महापालिकेच्या सर्व विभागांमधील विद्युत साहित्य जुने झाले असून, त्यामुळे मनपाच्या वीज देयकांत वाढ झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने जुने विद्युत साहित्य काढून घेत त्याऐवजी नवीन साहित्य बसविण्याचा प्रस्ताव मंजूर केला हाेता. सभागृहाने निविदा मंजूर केली असली, तरी अद्यापपर्यंतही साहित्य लावण्यात आले नाही.
कामगार कल्याण केंद्रालगत कचरा
अकाेला: जुने शहरातील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने बांधण्यात आलेल्या दुकानांसमाेर माेठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. यामुळे डुकरांचा वावर वाढला असून, दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रभाग ३ मध्ये नाल्या तुंबल्या
अकाेला: प्रभाग क्रमांक ३ मधील बापूनगर, रेल्वे क्वाॅर्टर यांसह वाल्मिकी चाैक परिसरातील नाल्या घाणीने व प्लास्टीक कचऱ्यामुळे तुडुंब साचल्या आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे. मनपाचे आराेग्य निरीक्षक व नगरसेवक या भागात ढुंकूनही पाहत नसल्याचा आराेप रहिवाशांनी केला आहे.
डम्पिंग ग्राउंडला आग
अकाेला : शहरातील कचरा प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्या जाताे. कचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शुक्रवारी कचऱ्याला आग लागल्याचे दिसून आले. आगीमुळे परिसरात धुराचे लाेट पसरले हाेते.
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
अकाेला : हद्दवाढीनंतर महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या वाशिम राज्य मार्गालगतच्या प्रभाग क्रमांक १८ मधील हिंगणा येथे पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक रहिवाशांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. या भागात हातपंप असले, तरी खाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची कुचंबणा हाेत आहे.
मनपाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
अकाेला : शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असून, त्याला अटकाव घालण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने घराेघरी जाऊन नागरिकांच्या आराेग्य सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. यासाठी ३०७ द्विसदस्यीय पथकांचे गठन करण्यात आले असून, सर्वेक्षणाची माेहीम अंतिम टप्प्यात आहे. यानंतर, आजारी रुग्णांचा खरा आकडा समाेर येण्यास मदत हाेणार आहे.
लसीकरणासाठी कस्तुरबामध्ये गर्दी
अकाेला: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ३ मार्चपासून ६० वर्षांवरील वयाेवृद्ध नागरिक व दुर्धर आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी मनपाच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केल्याचे चित्र हाेते. यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले हाेते.