मंथन कविता:::
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:17 AM2021-04-18T04:17:43+5:302021-04-18T04:17:43+5:30
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव धूमधडाक्यात सुरू आहे... आणि तुम्ही हे काय रस्त्यावर बसलात? अरे विदेशी पाहुणे येणार त्यांच्या समोर हे नारे ...
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
धूमधडाक्यात सुरू आहे...
आणि तुम्ही हे काय
रस्त्यावर बसलात?
अरे
विदेशी पाहुणे येणार
त्यांच्या समोर
हे नारे देणे..
घोषणा देणे ...
बरे दिसते का?
म्हणून मी काय म्हणतो-
तुम्ही उठा या रस्त्यावरून
आणि चला चकचकीत
मॉल्समध्ये..
तुम्हाला देशाची प्रगती
का नाही दिसत ?
विदेशी लोक पैसा गुंतवताहेत
आपल्या देशात ...
कधीकाळी ते राज्य करायचे
आज त्यांचा पैसा येणे
म्हणजे
प्रगतीकडे वाटचाल होय...
अरे
कसे समजून सांगू मी तुम्हाला?
तुमच्या साठीच
संपूर्ण देशाच्या बाजारपेठा
खुल्या केल्यात
ज्या राज्यात जास्त दाम
तिथे विका तुमचा माल
मी तर म्हणतो -
विदेशातही विका माल
आणि व्हा मालामाल...
पण तुमची फसवणूक नको
म्हणून
माझ्या मित्रांनाच
विका तुमचा माल
अरे तेही भारतीयच आहेत !
का विसरता तुम्ही?
मी तर म्हणतो-
तुमचे आता राबण्याचे
वय नाही
सुरकुत्या पडलेले चेहरे
आणि
हातापायांची झालेली लाकडे
घेऊन
जमिनीत काय पेरणार?
थंडगार सावलीत
तुम्ही आयुष्य काढावं
म्हणून मी करतोय तरतुद
कंत्राटी शेतीची
तर तुम्ही म्हणता -
मी देश काढलाय विक्रीला..
अरे
खरेदी विक्री हा चलनाचा प्रश्न
चलनातूनच अर्थव्यवस्था उंचावते..
समजेल तुम्हाला हळूहळू ...
पण
त्यासाठी तुम्ही आधी
रस्त्यावरून उठले पाहिजे..
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा बेंबीच्या देठापासून
जयघोष केला पाहिजे..
हे सोशल मीडियावाले
खोटं खोट्ं सांगताहेत
तुकड्या-तुकड्यात
तुमच्या बाजूने
बोलत आहेत...
पण हे सर्व तुकडेवाल्या
ग्यांगचे लोक आहेत ...
गर्दी काय गारुड्याच्या खेळातही होते? गारुड्याचे आयुष्य त्याने बदलते का?
वर्षानुवर्षे उघड्यावर शेती
करणाऱ्याचे काय करायचे कौतुक?
त्यांच्या जीन्समध्येच असतात
लढणाऱ्या पेशी...
मी मनापासून सांगतो
मनकी बात
पण तुम्ही बिचारे बहिरे
माझा आवाज तुमच्यापर्यंत
पोहोचतच नाही....
अरे बघा
जग कुठे पोहोचले ...
त्यांनी नाही विचारले प्रश्न
शेतीला मूलबाळ
का होत नाहीत म्हणून?
तुम्ही पिढ्यानपिढ्या
शेती केली
म्हणून कर्जात जन्मला
कर्जात वाढला
आणि कर्जातच
मरणारआहात...
हे शाश्वत सत्य
का नाही समजत तुम्हाला?
शेतीला मुक्त बाजारात
उद्योगाचा दर्जा देणार मी..
मी काय म्हणतो ?
तुमच्या पर्यंत
माझा आवाजच
का नाही पोहचत ?
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात
तुम्ही असे रस्त्यावर बसलेले
चांगले दिसत नाही ...
तुम्ही असे रस्त्यावर बसलेले
चांगले दिसत नाही...
नरेंद्र लांजेवार
बुलडाणा
---------------
काेराेनाचा कहर
कोरोनाने विश्व घेरता
जग बंदीशाला झाले
कुणावर वज्रघात होता
मृतदेह अस्पर्शी ठरले
पुण्यवान ते जे खांद्याहून गेले
विधिवत अंत्यसंस्कार झाले
या कोरोनाने आप्त परके केले
मरण्याचे ते चांगले दिवस गेले
जीवंतपणी ओलीप्रीती
ना मिळे मृतदेह आप्तांचे हाती
कोरोनाने नाते बदनाम केले
मरण्याचे चांगले दिवस गेले..
प्राणज्योत कुणाची मावळे
कुणी अंत्ययात्रेस ना जाती
फोनवरून सांत्वन सुरु झाले
मरणाचे ते चांगले दिवस गेले
कुणी कुणाचे कलेवर नेती
बदनाम होती रक्ताची नाती
मरणास स्मशानही अपुरे पडले
मरण्याचे ते चांगले दिवस गेले....
सुभाष धाराशिवकर, अकाेला