मंथन: कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:39+5:302021-09-19T04:20:39+5:30
एक झाड होते माझ्या घरासमोर त्याने आमचे मन जोडले पहाटे पहाटे तो नाराज दिसला कारण ते झाड कुणीतरी तोडले ...
एक झाड होते माझ्या घरासमोर
त्याने आमचे मन जोडले
पहाटे पहाटे तो नाराज दिसला
कारण ते झाड कुणीतरी तोडले
त्याचं झाडाच्या सावलीत मी
त्याची वाट पाहत असायची
वाळलेली पान तळहातावर
अलगद झेलायची....
त्या वाऱ्याची झुळूक
अंगाला बिलगायची....
झाडाच्या खोडावर
त्याचे नाव कोरायची
अजूनही प्रत्येक खोडावर
त्याचे नाव शोधत असते
कुणी तोडेल या भीतीने
अगदी स्वस्थ बसत असते...
कल्पना डोईफोडे, वरुर जऊळका, ता.अकाेट
----------
पावसाळा
वाट्टेल तिथं वाटेत आता,
मला गाठतोय पावसाळा...
हल्ली फारच अनोळखी
मला वाटतोय पावसाळा..!
हरवतो मी सुद्धा प्रिये
तुझ्या जुन्या आठवणीत,
अन् माझ्यासवे घनदाट,
प्रिये दाटतोय पावसाळा..!
कधी कधी फार त्रास
मला होतो आसवांचा,
डोळ्यांमध्ये भार होऊन,
मग साठतोय पावसाळा..!
त्या कागदांच्या होड्या
फार आठवतात आता,
मी भिजतोय मनसोक्त
अन् आटतोय पावसाळा..!
वाट्टेल तिथं वाटेत आता,
मला गाठतोय पावसाळा...
हल्ली फारच अनोळखी
मला वाटतोय पावसाळा..!
- जावेद शेख, जळगाव जामोद
जि.बुलडाणा
------