शिर्ला पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांची निराशा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:39+5:302021-03-24T04:16:39+5:30
पातूर पंचायत समितीच्या बचत भवनामध्ये आज शिर्ला, खानापूर आणि आलेगाव गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. शिर्ला आणि खानापूर गण ...
पातूर पंचायत समितीच्या बचत भवनामध्ये आज शिर्ला, खानापूर आणि आलेगाव गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. शिर्ला आणि खानापूर गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला, तर आलेगाव गण सर्वांसाठी खुला झाला.
शिर्ला गणाचे नेतृत्व पातूर शिवसेना शहरप्रमुख अजय ढोणे यांच्याकडे होते. त्यांना पंचायत समितीच्या गटनेते पदाची जबाबदारी शिवसेनेने दिली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये विभागणी झाली होती. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चौरंगी लढत झाली होती.
शिर्ला पंचायत समिती गण स्त्री राखीव झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघांमध्ये कामाला लागलेल्या विविध राजकीय पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. आता कोणाला उभे करावे. यासाठी महिला उमेदवाराची शोधमोहीम नव्याने आजपासून सुरू होत आहे.
खानापूर पंचायत समिती गण गतवेळी ओबीसी महिलांसाठी राखीव होता. तो आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे या मतदारसंघात अधिकच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
गतवेळी आलेगाव गणाला ओबीसी महिला राखीव जागेला पंचायत समितीचे उपसभापती पद मिळाले होते. यावेळी हा मतदारसंघ सर्वांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आलेगाव पंचायत समिती गणांमध्ये निवडणुकीची रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
खानापूर, आलेगाव वगळता पंचायत समिती शिर्ला गणात सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलले आहेत. या मतदारसंघात गतवेळच्या तुलनेमध्ये जवळपास पाच हजार मतदार पातूर नागरी क्षेत्रातून शिर्ला गणात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांचा कस लागणार असला तरी कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी राजकीय पक्षांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.