वनाैषधी, दिनचर्या, आहाराद्वारे अनेकांना केले राेगमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:17 AM2021-01-04T04:17:16+5:302021-01-04T04:17:16+5:30
संतोषकुमार गवई पातूर : आजच्या धावपळीच्या युगात अगदी लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आजारपणावर लाखाे रुपये खर्चही ...
संतोषकुमार गवई
पातूर : आजच्या धावपळीच्या युगात अगदी लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. आजारपणावर लाखाे रुपये खर्चही हाेतात. मात्र, वनाैषधीतून शेकडाे रुग्णांना राेगमुक्त करणाऱ्या वनौषधी जाणकाराचे नाव सतीश निमकाळे. आसोला येथील ५० वर्षीय सतीश निमकाळे यांचे शिक्षण बी. ए.पर्यंत झाले आहे. स्वतःला समाजसेवेत झोकून गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून ते नावारूपास आले आहेत.
सध्या देशात वेगाने वाढत असलेला आजार म्हणजे शुगर (मधुमेह). परंतु हा आजार नेमका कशामुळे होतो? हा अनुवांशिक असतो का? यावर उपाय काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वनौषधीचे जाणकार सतीश निमकाळे यांच्याकडे आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटाचे विकार, मूळव्याधसारख्या असाध्य आजारांनी त्रस्त असलेल्या शेकडो रोग्यांना आपल्या वनौषधीच्या माध्यमातून रोगमुक्त केले.
सतीश निमकाळे यांना वनौषधींचे ज्ञान राजस्थानमधून प्राप्त झाले. गरज ही शोधाची जननी असते. या उक्तीप्रमाणे त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडल्या. त्यांच्या आईचे हृदय निकामी झाल्याने मृत्यू झाला. मुलाला हृदयाचा आजार, वडिलांना मधुमेह व पॅरॅलिसिस, तर पत्नीलासुद्धा हायग्रेड कॅन्सर अशा परिस्थितीत करावे काय? म्हणून सतीश निमकाळे यांनी रोग व रोगाची कारणे शोधण्याला सुरुवात केली. आहार हेच औषध असून आपली दिनचर्या बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नीला कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने ग्रासले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमोथेरपी देणे क्रमप्राप्त असतानासुद्धा किमोथेरपी न देता आपल्या पत्नीला कोणतेही औषध न देता त्यांनी कॅन्सरमुक्त केले. आज त्यांची पत्नी ठणठणीत आहे. सतीश निमकाळे यांच्या अभ्यासावरून माणूस व माणसाने पाळलेल्या प्राण्यांना रोगांनी ग्रासले असल्यामुळे आहार हेच औषध म्हणून घेणे बंधनकारक आहे, असे ते सांगतात. जो खाईल पोळी त्याची सुटणार नाही गोळी, असे त्यांचे ठाम मत आहे. कारण गव्हात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मानवी शरीरास ते हानिकारक असल्याचे ते सांगतात. वैद्य सतीश निमकाळे यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांना आपल्या नैसर्गिक वनस्पतीच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारातून मुक्त केले आहे. प्रधानमंत्र्यांच्या ‘फिट इंडिया’ माेहिमेत भाग घेऊन आपल्या गावापासून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्र रोगमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक हाेत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.