मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:51 PM2018-07-25T17:51:01+5:302018-07-25T17:53:52+5:30
अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला.
अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला अकोलेकरांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत बाजारपेठ, दुकाने, शाळा, महाविद्यालयांसह खासगी वाहतूक व्यवस्था बंद ठेवली होती. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने राज्यभरात उग्र रूप धारण केले आहे. सोमवारी गोदावरीत काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी संपूर्ण जिल्हाभरात बंदची हाक दिली. आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता शहरात बाइक रॅली काढून अकोलेकरांना बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. आंदोलकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अक ोलेकरांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी शहरातील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने, शाळा, महाविद्यालये यासह खासगी वाहने, आॅटोरिक्षा चालकांनी सेवा बंद ठेवणे पसंत केले. बंद दरम्यान शहरात कोठेही दगडफेक तसेच बळजबरी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात कोठेही फिरकू न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
असा घडला दिनक्रम!
* सकाळी ९ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक जमले.
* सकाळी १० वा. शहरात बाइक रॅली.
* सकाळी ११.३० ला कोपर्डी घटनेतील पीडित व जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली.
* सकाळी ११.५० वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, सरकारविरोधी घोषणाबाजी.
* दुपारी १ वाजता जुने शहरात बाइक रॅली, दुकाने बंद करण्याची विनंती.
* दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांवर जिल्हाबंदीचा ठराव घेऊन राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप.