एकच चर्चा... मराठा मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:43 AM2017-08-07T02:43:24+5:302017-08-08T11:15:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुंबईतील ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी मूक मराठा क्रांती मोर्चात अकोल्यातील सकल मराठ्यांना सहभागी करून घेण्यासाठी रविवारी सकाळी महानगराला परिक्रमा घालणारी
मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवा ध्वज फडकावित निघालेली हजारो मोटारसायकलींची रॅली दोन ओळींच्या शिस्तीत पार पडली. हातात आवाहनाचे फलक झळकावित निघालेल्या महिला-पुरुषांच्या निश:ब्द रॅलीने रविवारी अकोलेकरांचे लक्ष वेधले होते.
स्थानिक सिव्हिल लाईन चौकातील जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवनातून रॅलीस प्रारंभ झाला. ओपन जीप, त्यामागे फेटेधारी मोटारसायकलस्वार महिला, आणि दीड हजार मोटारसायकलस्वार पुरुषांची मोठी रॅली निघाली. चला मुंबई... असा फलक घेऊन निघालेली ही भव्य भगव्या ध्वजांची रॅली सिव्हिल लाइन चौकातून रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, खुले नाट्यगृह चौक, महापालिक कार्यालयासमोरून गांधीचौक, सिटी कोतवाली चौक, जिल्हा होमगार्ड कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोरून, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरून अशोक वाटिका चौक, जेल चौक, सिंधी कॅम्प, खदान मार्गावरून कौलखेड चौकात पोहोचली. येथून ही रॅली रिंगरोड, तुकाराम चौक, सहकार नगर मार्गाने, पावर हाउससमोरून नेहरूपार्क चौक आणि तेथून पुन्हा सिव्हिल लाइन चौकातून परिक्रमा करून जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवनात पोहोचली. रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान या मोटारसायकल रॅलीचा समारोप झाला.
राज्यातील ५७ मोर्चाप्रमाणेच हा मोर्चाही मूक मोर्चा असणार आहे. यामध्ये कोपर्डी प्रकरणाचा निकाल जलद गतीने झाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झालीच पाहिजे. अॅट्रासिटीसारख्या कायद्याचा गैरवापर होतो, यासाठी कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. मराठा समाजासाठी तत्काळ आरक्षण जाहीर करून अंमलबजावणी करावी, अशा मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहेत. सकल मराठ्यांना या मूक मोर्चात सहभागी करण्याच्या जनजागृतीसाठी ही मोटारसायकल परिक्रमा रॅली रविवारी काढली गेली.