Maratha Reservation Protest: अकोला येथे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या
By atul.jaiswal | Published: August 5, 2018 01:51 PM2018-08-05T13:51:37+5:302018-08-05T15:18:24+5:30
अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, डॉ. पाटील यांनी आंदोलकांना सामोरे जाताना सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकुल असल्याचा शब्द दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात धुमसत आहे. गोदावरीत काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात आंदोलनाने पेट घेतल्याचे दिसून आले. २५ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचे चित्र होते. बंददरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्हा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने त्यांचा रोख जिल्ह्यातील मराठा समाजाचे खासदार, मंत्री, आमदार यांच्याकडे वळविला आहे. समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यासाठी क्रांती मोर्चा आग्रही आहे. त्यानूषंगाने १ आॅगस्ट रोजी खासदार व आमदारांच्या घरासमोर आंदोलन केल्यानंतर शनिवार, ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘असा कसा देत नाही- घेतल्या शिवाय राहत नाही’, ‘तुमचे आमचे नाते काय- जय जिजाऊ जय शिवराय’, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर डॉ. रणजीत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाप्रतीची सरकारची भूमिका विषद केली. यावेळी त्यांनी आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
गृहराज्यमंत्र्यांनी घेतला बेसन-भाकरीचा आस्वाद
पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या देणाऱ्या मराठा समाज आंदोलकांनी दुपारच्यावेळी सोबत आणलेल्या बेसन-भाकरीच्या शिदोºया सोडल्या. यावेळी आंदोलकांनी डॉ. रणजीत पाटील यांनाही बेसण-भाकर खाण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देत डॉ. पाटील यांनी आंदोलकांमध्ये बसून त्यांच्यासोबत बेसन-भाकर खाल्ली.