मराठा एकजूट आज दाखविणार ताकद
By admin | Published: September 19, 2016 02:54 AM2016-09-19T02:54:07+5:302016-09-19T02:54:07+5:30
सकल मराठा क्रांती मूक मोर्चा; पाच हजार युवा स्वयंसेवकांची राहणार करडी नजर.
अकोला, दि. १८: कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अँट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी सोमवार १९ सप्टेंबर रोजी अकोल्यात सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांतर्फे या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता अकोला क्रि केट मैदानावरू न मोर्चाला सुरुवात होणार असून, पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर जिजाऊ वंदना तसेच मोर्चात सहभागी बांधवांची कृतज्ञता व्यक्त केली जाईल. शेवटी राष्ट्रगीतानंतर मोर्चाचे विसर्जन होईल. या मोर्चात अकोला क्रिकेट क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाच हजार युवा स्वयंसेवकांची साखळी राहील, या स्वयंसेवकांची प्रत्येक घटनेवर बारीक नजर असेल.
राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मोर्चाप्रमाणेच हा मोर्चासुद्धा भव्य होईल, लाखोच्या संख्येने लोक येतील; मात्र संपूर्णपणे शिस्तबद्ध मोर्चा झाला पाहिजे याची दक्षता समितीसह समाज घेत आहे. समितीने पाच हजार स्वयंसेवकांची चमू तयार केली आहे. यामध्ये ५00 महिला स्वयंसेवक असतील. संपूर्ण मोर्चाचे ड्रोनद्वारे छायाचित्रण केले जाणार असून सीसी कॅमेर्यांचीही मोर्चावर नजर राहणार आहे, मोर्चा शिस्तबद्ध असणार असला तरी आयोजकांनी १६ समित्या गठित केल्यात असून, प्रत्येक समितीवर विविध जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. अकोला क्रिकेट मैदानावरू न सहाच्या जणांच्या ओळीने मोर्चा निघेल, गर्दी किंवा गोंधळ उडणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. महिला, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोर्चात बहुसंख्यने उपस्थित राहणार आहेत. वृद्ध महिलांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चानंतर शहरात कचरा राहू नये यासाठीची विशेष काळजीही घेण्यात आली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील काही खासगी शाळा, महाविद्यालयांनी सोमवारी सुटी जाहीर केली असून, शिक्षणाधिकार्यांनी सुटी घेण्याबाबत शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावेत असे शाळा, महाविद्यालयांना सुचविले आहे. मोर्चानिमित्त शहरातील काही व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हय़ातील गावे, तालुकास्तरावर मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून, एसटी बस, खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात व बाहेर वाहने ठेवण्याची जी व्यवस्था करण्यात आली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी ५0 स्वयंसेवक मोर्चात सहभागी होणार्या वाहनधारकांना मदत करतील. सर्व स्वयंसेवक विशिष्ट गणवेश परिधान केलेले असतील. प्रत्येकाला बॅच देण्यात येतील. मोर्चाची तयारी म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती शहरात व तालुक्याच्या ठिकाणी पथनाट्य सादर करीत असून, कोपर्डी येथील घटनेचे चित्रण या पथनाट्यातून सादर केले जात आहे. यासारख्या घटना भविष्यात होणार नाहीत, यासाठीचे प्रबोधनही या पथनाट्याद्वारे जनतेसमोर मांडले जात आहे. तसेच मोर्चाबाबत शहरात कॉर्नर बैठका घेण्यात आल्या आहेत. न्यू अग्रेसन भवनात आ. रणधीर सावरकर यांनी बैठक घेतली.
क्रिकेट क्लबवर यंत्रणा सज्ज
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी रात्रीपासूनच यंत्रणा सज्ज झाली आहे. पेंडाल उभारणीसोबतच प्रत्येकी सहा माणसांची ओळ कशी सोडावी, याचे नियोजन केले जात आहे. नियोजन समितीमधील अनेक आयोजक रात्रीपासूनच येथे डेरेदाखल झाले, तर काही पहाटे येथे दाखल होणार आहेत.
दानपेटी अजून भरते आहे
राज्यभरात सर्वच जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. त्यासाठी कोणी किती निधी दिला, हे अजूनही गोपनीय आहे. दानपात्रात ज्याला जमेल तेवढी रक्कम टाकावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी भवनामध्ये यासाठी दानपेटी ठेवली गेली आहे.
अत्याधुनिक माध्यमांचा प्रचारासाठी वापर
फोर व्हीलर कार, मोटारसायकली, मोबाइलवरील व्हॉट्स अँपवरून, फेसबुकवरून मोर्चाचा एवढा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, की स्वयंस्फूर्तीने लोक जथ्थ्याने सहभागी होणार आहेत. शहरात कुठेही नजर टाकली तरी मराठा क्रांती मोर्चाचे पत्रक दिसल्याशिवाय राहत नाही.