मराठी भाषा गौरव दिन : शिधापत्रिकेवर कुसुमाग्रजांची कविता; कार्डधारक मात्र अनभिज्ञच
By Atul.jaiswal | Published: February 27, 2022 12:38 PM2022-02-27T12:38:22+5:302022-02-27T12:38:54+5:30
Marathi Bhasha Din : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
- अतुल जयस्वाल
अकोला : मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेच्या काही ओळी केशरी शिधापत्रिकेवर अंकित करण्यात आल्या आहेत. ज्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, त्या कवी कुसुमाग्रजांची कविता शिधापत्रिकेवर आहे, हे मात्र अनेकांना माहीतच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषेत अनेक कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कवितांचे लेखन करून मराठी भाषेला समृद्ध करण्यात हातभार लावणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्यावर स्वातंत्र्य देवीची विनवणी ही अजरामर कविता लिहिली. ही कविता शिधापत्रिकांच्या मलपृष्ठावर छापण्यामागे असलेला शासनाचा उद्देश लोकांच्या अनभिज्ञतेमुळे सफल होताना दिसत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अनेकदा शिधापत्रिका हाताळली जात असली, तरी मागच्या पृष्ठावर काय आहे, हे माहीत नसणे, ही एक शोकांतिकाच म्हणावी. कुसुमाग्रजांनी कवितेत वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नसल्याने या विनवणीची आजही खूप गरज आहे.
रेशनकार्डच्या शेवटच्या पृष्ठापर्यंत जाण्याची कधी गरजच वाटली नाही. या पानावर काय आहे, हे देखील कधी पहावे वाटले नाही. कुसुमाग्रजांची अजरामर कविता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- माणिकराव इंगळे, अकोला
दररोज रेशनकार्ड हाताळतो, परंतु, मागच्या पृष्ठावर काय लिहिलेले आहे, हे कधी जाणून घेतले नाही. या पानावर कुसुमाग्रजांची कविता आहे, हे आज पहिल्यांदाच माहीत झाले.
- रमेश सरदार, भौरद
रेशनकार्ड वापर केवळ रेशन दुकानात आणि इतर शासकीय कामाच्या वेळी होतो. हे कार्ड हाताळताना पहिले पृष्ठ पाहिले जाते. मागच्या पानावर काय आहे हे आजपर्यंत पाहिलेच नाही.
- दादाराव सिरस्कार, उगवा
रेशनकार्डावर कवी कुसुमाग्रजांची कविता आहे, हे मला माहीत होते. मला आजही आठवते, सातवीत असताना ती कविता मी वाचत असे.
- शालूबाई सिरसाट, अकोला
कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापनदिनी लिहिलेली ही कविता मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. ही कविता रेशनकार्डाच्या शेवटच्या पृष्ठावर आहे, याचीही मला जाणीव आहे.
- शेषराव सिरसाट, आगर