मराठी राजभाषा दिन : बोलीभाषेसह मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:12 PM2019-02-27T12:12:18+5:302019-02-27T12:12:54+5:30
अकोला: बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव आहे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. असे असतानाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. मराठी मरणासन्न अवस्थेकडे जात आहे.
अकोला: बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव आहे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. असे असतानाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. मराठी मरणासन्न अवस्थेकडे जात आहे. असे बोलले जाते; परंतु आम्हाला मराठी भाषेचा कितपत अभिमान आहे! इंग्रजी भाषेचा वाढता वापर, बोलीभाषेविषयी असलेला न्यूनगंड दूर सारून बोलीभाषेसह मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मराठी भाषा तज्ज्ञ, शिक्षकांनी व्यक्त केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त लोकमतच्यावतीने मंगळवारी परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यात मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि भाषा वृद्धीसाठी होणारे प्रयत्न, अभिजात दर्जा मिळविण्यासाठी मराठीला करावा लागत असलेला संघर्ष या विषयावर मराठी भाषा त्ज्ज्ञ, शिक्षकांनी मत मांडले. मराठी भाषा मागे पडत नाही तर आम्ही इंग्रजीकडे आकर्षित होत आहोत. इतर भाषिक भेटल्यावरही आम्ही मराठीतून संवाद साधत नाही, हीच आमची दुर्बलता आहे. मराठी साहित्यावर भर दिला जातो; परंतु भाषेवर नाही. इंग्रजी जागतिक भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा धोक्यात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. मराठी ज्ञानभाषा व्हावी, रोजगाराची भाषा व्हावी, घरातूनच मराठी भाषेचा आग्रह व्हावा, अक्षर वाङ्मय निर्माण झाले तर मराठी भाषेचा दर्जा वाढेल, असे मतसुद्धा मराठी भाषा तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मराठी ही मातृभाषा असतानाही आम्ही तिचा वापर व्यवहारात किती करतो! हिंदी भाषिक व्यक्ती भेटल्यानंतरही मराठीतून न बोलता, हिंदीतून बोलतो. येथेच आम्ही दुर्बल ठरतो. मराठी साहित्यावर भर देतो; परंतु भाषेवर नाही. इंग्रजीने जगभरातील अनेक शब्द स्वीकारले. त्यामुळे ती जागतिक भाषा झाली. मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. बोलीभाषेबाबत असलेला न्यूनगंड दूर सारला पाहिजे.
-पुष्पराज गावंडे, वºहाडी साहित्यिक.
मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे; परंतु तरीही मराठीस अभिजात दर्जा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. इंग्रजी भाषा आम्ही नाकारू शकत नाही; परंतु बोलीभाषा जतन करण्यासाठी पालकांनी मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे. मराठी मातृभाषा म्हणून तिला पुढे रेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात. म्हणून पालकसुद्धा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. मराठी भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे.
-गिरिजा कानडे, शिक्षिका
मराठी, बी.आर. हायस्कूल.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शासनाने केंद्र स्तरावर प्रभावीपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. मातृभाषेविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. ग्रामीण संस्कृती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा लोप पावणार नाही. भाषा संवर्धनासाठी वेगवेगळी माध्यमे आहेत, त्याचा वापर केला पाहिजे. इंग्रजीने जगभरातील बोलीभाषेतील शब्द घेतले. मराठी भाषेनेसुद्धा ते शब्द स्वीकारावे. बोलीभाषा बोलताना अनेकजण लाजतात. हा न्यूनगंड बाजूला सारला पाहिजे.
प्रा. रावसाहेब काळे, वºहाडी बोलीभाषा तज्ज्ञ,
शिवाजी महाविद्यालय
मराठी भाषेला संवैधानिक दर्जा आहे. मराठीत भाषेतच ज्ञानाचा खजिना आहे. बोलण्यातून, लेखनातून, व्यवहारातून मराठी भाषाच झिरपली पाहिजे. मराठी भाषेविषयी शासन उदासीन आहे, असे नाही. मराठी भाषेचा वापर व्यवहारामध्ये झाला पाहिजे. याची सक्ती शासनाने केली आहे. मराठी वर्णमाला, लिपीबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. बाराखडीसोबतच आता आपण चौदाखडी शिकतो आहोत. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करून मराठी शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन मराठी माध्यमातूनच जागतिक अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
-भिमसिंग राठोड, मराठी विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्था
मराठी भाषा रोजगाराची भाषा नसल्यामुळे इंग्रजीकडे कल वाढला आहे. बदलत्या काळानुसार इंग्रजी भाषेचीसुद्धा गरज आहे. मराठी भाषा मरणासन्न अवस्थेकडे जात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. लोकभाषेतून बोलणाऱ्या व्यक्तीकडे समाजाने बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. शुद्ध भाषा बोलणारा शिक्षित आणि बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ आहे, असे अनेकजण समज करतात. हा न्यूनगंड दूर व्हावा. भाषा विकासाकडे लक्ष न देता शुद्धीकडे अधिक लक्ष दिल्या जाते, हे चुकीचे आहे. बोलीभाषेसह मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी.
-प्रा. डॉ. भास्कर पाटील,
मराठी भाषा तज्ज्ञ, सुधाकरराव नाईक,
महाविद्यालय