माळरानात उगवणारी ‘बावची’ अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल
By admin | Published: January 12, 2017 08:19 PM2017-01-12T20:19:57+5:302017-01-12T20:19:57+5:30
माळरानातील धु-यांवर उगवणारी ‘बावची’ मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. उडीद पिकासमान दिसणारे ‘बावची’चे बीज त्वचाविकारांवर गुणकारी
Next
>- राम देशपांडे/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 12 - माळरानातील धु-यांवर उगवणारी ‘बावची’ मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. उडीद पिकासमान दिसणारे ‘बावची’चे बीज त्वचाविकारांवर गुणकारी असून, त्यास विदर्भासह पूर्व प्रांतात अधिक मागणी असल्याने अकोल्यासह वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी विकलेली ‘बावची’ अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.
त्वचाविकारांवर गुणकारी ठरणा-या ‘बावची’ या वनस्पतींचे अनेक औषध उपयोग आहेत. ‘बावची’ ही आयुर्वेदिक वनस्पती बावच, भवानी, बकुची, चंद्रलेखा, कालमेशी, शशिलेखा, सोमराजी, सुगंध कंटक, कुष्ठनाशिनी आदी नावांनी ओळखली जाते. त्वचाविकारात अग्रणी समजल्या जाणाºया ‘बावची’चे झुडुप छोटे, पाने हृदयाकृती आणि गोलाकार असतात. बावचीची फुले व फळे गुच्छानेच येतात. निळ्या रंगाची तुरे, तर फळ काळ्या रंगाचे असते, फळातले बीजही काळ्या रंगाचे व विशिष्ट सुगंध येणारे असते. बावचीला हिवाळ्यात फुले व फळे येतात. औषधासाठी बावचीचे बीज व बीजातून काढलेले तेल वापरले जाते. वाटलेल्या ‘बावची’च्या बिया पेट्रोलियम जेलीमध्ये मिसळून डागांवर लावल्यास डाग हळू हळू कमी होतात. ‘बावची’चे बीज विरेचक व कृमिनाशक असून, कुष्ठरोग, पांढरे कोड, खरुज, त्वचारोग आदी त्वचारोगांवर अत्यंत गुणकारी असल्याची माहिती पुणे येथील वनशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिगांबर मोकाट यांनी ‘लोकमत’ला दिली. विदर्भासह पूर्व प्रांतात बावचीला अधिक मागणी असल्यामुळे अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील माळरानात उगवणारी ‘बावची’ अकोल्यातील व्यावसायिकांमार्फत नागपूरच्या बाजारपेठेत पोहोचते.