बाजार समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या लढती शुक्रवारी ठरणार
By Admin | Published: August 10, 2015 01:37 AM2015-08-10T01:37:41+5:302015-08-10T01:37:41+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत.
अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, १४ ऑगस्टपर्यंत असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या लढतींचे चित्र ठरणार आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात घेण्यात आलेल्या २१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून २ आणि हमाल व मापारी मतदारसंघातून १, अशा एकूण १८ संचालक पदांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी ३0 जुलैपर्यंत चारही मतदारसंघातून एकूण १0३ उमेदवारांकडून दाखल झालेल्या ११५ उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया १ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. त्यामध्ये पाच उमेदवारांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, उर्वरित ९८ उमेदवारांचे ११0 उमेदवारी अर्ज वैध ठरले. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ ऑगस्ट दुपारी ४ वाजेपर्यंत असून, ६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या लढतींचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी (शुक्रवारी) स्पष्ट होणार आहे. त्यानुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोण-कोण उमेदवारी मागे घेणार आणि कोण-कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याकडे आता सहकार क्षेत्रातील राजकारण्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.