उद्यापासून बाजारपेठ उघडण्याची शक्यता; आज होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:27 AM2021-03-04T10:27:39+5:302021-03-04T10:27:55+5:30
Corona Unlock in Akola आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत बुधवारी नियोजन भवनात झालेल्या बैठकीत सांगितले.
अकोला : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अकोला महानगरपालिका, मूर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र या प्रतिबंधात्मक क्षेत्रात लागू असलेले लॉकडाऊनचे कडक नियम शिथिल करण्याबाबतचा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याबाबत निर्णयासाठी आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत बुधवारी नियोजन भवनात झालेल्या बैठकीत सांगितले. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठ खुली होण्याची शक्यता आहे.
नियोजनभवनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या लक्षात घेत दुकाने उघडण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायिकांनी कुटुंबासह, कामगारांचीही कोविड चाचणी करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुकाने खुली करण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत आयुक्तांकडून मार्गदर्शन मागवून गुरुवार दुपारपर्यंत आदेश काढू, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच कोविड चाचणी करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
धार्मिक स्थळे बंदच राहणार!
अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस तसेच जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे, सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.