बाजारातील मंदीला नवरात्रीच्या तेजीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 02:05 PM2018-10-09T14:05:45+5:302018-10-09T14:08:24+5:30
अकोला : पितृपक्षात शक्यतोवर खरेदी टाळली जात असल्याने संपूर्ण बाजारपेठेत मंदी आलेली आहे. नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रास-गरब्याची सजावट, गरब्यासाठीचे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी, वाहन खरेदी, सोने खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे पुन्हा पलटतील, अशी अपेक्षा बाजारातील दुकानदारांना लागलेली आहे
अकोला : पितृपक्षात शक्यतोवर खरेदी टाळली जात असल्याने संपूर्ण बाजारपेठेत मंदी आलेली आहे. नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रास-गरब्याची सजावट, गरब्यासाठीचे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी, वाहन खरेदी, सोने खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे पुन्हा पलटतील, अशी अपेक्षा बाजारातील दुकानदारांना लागलेली आहे. बाजारातील मंदिला नवरात्रीत तेजीची उभारी येईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विविध धार्मिक उत्सवांच्या भोवती आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था फिरत असते. यातील काही घटक बदलल्याने आणि नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने आता समाजावर त्याचा वेगळा परिणाम दिसून येत आहे. नुकताच राज्यात गणेशोत्सव झाला. त्यानिमित्ताने बाजारपेठेत काही प्रमाणात का होईना, तेजी आली होती. मिठाई, फळ, मांडव, रोषणाई, हार, फुले यांच्याभोवती गर्दी दिसली. दरम्यान पितृपक्ष आल्याने ग्राहकांनी पुन्हा बाजारपेठेकडे पाठ फिरविली. त्यामुळे काही दिवसांपासून बाजारात कमालीची मंदी आलेली आहे. मंगळवार, ९ आॅक्टोबरच्या सर्वपित्री अमावास्येनंतर प्रतिपदेने घटस्थापना होणार आहे. नवरात्रीनिमित्त बाजारातील मंदी दूर होण्याची अपेक्षा अनेकांना आहे. नवरात्रीपासून तर दिवाळीपर्यंत बाजारात कायम तेजी राहील, असेही बोलले जात आहे; मात्र डॉलरपुढे भारतीय रुपयांची झालेली घसरण, शेअर बाजार आपटल्याने सोन्यात आलेली उभारी याचादेखील बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नेमकी बाजारपेठेची स्थिती काय राहील, याबाबत केवळ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आॅनलाइन बाजार तेजीत
सर्वच आॅनलाइन कंपन्यांनी खास नवरात्रीनिमित्त पोशाखांची विक्री सुरू केली आहे. ३५० रुपयांपासून तर २,७५० रुपयांपर्यंतचे पोशाख आॅनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष सेल बाजार आॅनलाइनवर असल्याने युवा पिढीचा कल त्याकडेच जास्त आहे.
*इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ सज्ज
नवरात्री आणि दिवाळीनिमित्त बाजारात तेजी येणार असल्याची अपेक्षा ठेवून मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची मागणी आम्ही करून ठेवली आहे. घटस्थापनेपासून हा माल उतारला जाणार आहे. यासाठी अनेक सवलती कंपनीकडून दिल्या जात असून, कर्ज पुरवठा कंपन्यांही तयार आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूची अकोल्यातील वितरक श्रीराम मित्तल यांनी व्यक्त केली.
*महिन्यात एक हजाराने सोने वाढले!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीमुळे एका महिन्यात एक हजार रुपयांनी सोने वधारले आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याकडे फिरकतीलच असे नाही. नवरात्री आणि त्यानंतर येणाऱ्या धनत्रयोदशीला मात्र ग्राहक बाहेर पडतोच, तेव्हा तो सोन्याचे दर पाहत नाही, मुहूर्त पाहतो, असे मत ज्वेलरी संचालक प्रकाश लोडिया यांनी व्यक्त केले आहे.