शुक्रवारपासून होणार बाजारपेठ खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:50+5:302021-03-04T04:34:50+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचना व विभागीय आयुक्तांनी २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला. त्यानुसार ...
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचना व विभागीय आयुक्तांनी २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू करण्यात येत आहेत. सुरुवातीला १ मार्चपर्यंत होती; मात्र आता ही मुदत ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी विविधस्तरांवरुन झाली. अखेर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनमध्ये प्रशासन व व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांमध्ये बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य अधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मत जाणून घेतले. दाेन दिवस किरणा दुकाने बंद ठेवणे, ऑड इव्हन सूत्रानुसार दुकाने सुरु ठेवणे आदींचा समावेश हाेता; मात्र हे दाेन्ही मुद्दे चर्चेदरम्यान फेटाळण्यात आले. अखेर व्यापाऱ्यांनी दुपारी ५ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली. तसेच शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्याची तयारी काही व्यापाऱ्यांनी दर्शविली. यावर जिल्हाधिकारी सकारात्मक हाेते. आता याबाबत लवकरच अंतिम निर्णय गुरुवारी जारी हाेण्याची शक्यता आहे. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे प्रभारी आयुक्त जावळे, उपविभागीय दंडाधिकारी डाॅ, नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम उपस्थित हाेते.
कोविड चाचणीसह नियमांचे पालन करणे बंधनकारक
जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना काेविड चाचणीसह नियमांचे पालन करणे आवश्यकच राहणार असल्याचे स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी कोविडची चाचणी करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांवर काही दिवसांसाठी सीलची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दुकानामध्ये गर्दी हाेणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी व्यापाऱ्यावर राहील. व्यापारी,कर्मचारी व ग्राहकांना दुकानात विना मास्क येता येणार नाही. हाॅटेलमधून केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे.
कोरोना चाचणीचे आवाहन
सर्व व्यापाऱ्यांना कुटुंबासह त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करूनच व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाने सत्कारात्मक दर्शविली अाहे. त्यामुळे सर्व व्यावसाियकांनी स्वतःसह प्रतिष्ठानात काम करणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.