पणन संचालनालयाकडून बाजार समितीचा अर्ज रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:50+5:302021-09-24T04:22:50+5:30
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत्यांची सोयाबीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर नर्मदा साॅल्वेक्स कंपनीचा खरेदी परवाना ...
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत्यांची सोयाबीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर नर्मदा साॅल्वेक्स कंपनीचा खरेदी परवाना रद्द करण्याचा अर्ज पणन संचालनालयाकडे केला होता. या अर्जावर पुणे येथील ‘पणन’च्या संचालकांसमाेर सुनावणी झाली. यावर संचालनालयाच्या प्रमुखांनी बाजार समितीचा अर्ज रद्द ठरविल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे रामदासपेठ पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याची माहिती आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत्यांनी नर्मदा सॉल्वेक्स कंपनीला विकलेल्या सोयाबीनचा १ कोटी ८७ लाख रुपयांचा चुकारा नर्मदाच्या संचालकांनी केला नाही़ त्यामुळे या प्रकरणाची तक्रार रामदास पेठ पाेलिसात केल्यानंतर पाेलिसांनी शिवप्रकाश रुहाटिया व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी लक्ष्मी ट्रेडर्सच्या जावेद कादरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आली आहे.
फेरचौकशी करण्याचे निर्देश
दरम्यान, सोयाबीन विक्री प्रकरणी बाजार समितीमधील अडत्यांची तक्रार लक्षात घेता, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ व नियम १९६७ मधील तरतुदीनुसार फेरचौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.