पणन महासंघ सध्या कापूस खरेदी करणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:16 PM2020-04-12T17:16:08+5:302020-04-12T17:16:27+5:30
सध्यातरी पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरू करण्याचा कुठलाही बेत नाही.
अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर शेतमाल विक्री बंद आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघानेदेखील कापूस खरेदी केंद्र बंद ठेवले आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव संपेपर्यंत केंद्र सुरू होणार नाही.
पणन महासंघाने राज्यात आतापर्यंत ५४ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खरेदी सुरू असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. तेव्हापासून पणन महासंघाने राज्यातील आपली सर्व खरेदी केंद्रे बंद केली आहेत; परंतु उद्या सोमवार, १३ एप्रिलपासून अशी खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत, असा संदेश सामाजिक माध्यमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पसरविण्यात आला आहे. या संदेशामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची तयारी केली असेल; परंतु कोरोनाचा वाढता प्रसार बघता शासनाने ३० एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविले आहे. त्यामुळे सध्यातरी पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरू करण्याचा कुठलाही बेत नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. शेतकºयांनी कापूस विक्रीकरिता आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.