जिल्ह्यातील ३१ गावांत बांधणार बाजार ओटे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:20+5:302021-01-20T04:19:20+5:30
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याेजनेंतर्गत अभिसरणाच्या कामातून जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये छतासह बाजार ओटे बांधकाम करण्याचे ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याेजनेंतर्गत अभिसरणाच्या कामातून जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये छतासह बाजार ओटे बांधकाम करण्याचे जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत मंगळवारी ठरविण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत व अंगणवाड्यांच्या शिकस्त इमारतीसंबंधी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. पातूर तालुक्यातील पांगरताटी वनदेव येथील रस्त्याची समस्या सोडविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून, हा ठराव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पाठविण्याची शिफारस सभेत करण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने, यासंदर्भात संबंधित कार्यकारी अभियंत्यांना तातडीने कळविण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत मंजूर निधीतून प्रस्तावित कामांना सर्वसाधारण सभेत मान्यता घेण्याची शिफारस या सभेत करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य पवन बुटे, विनोद देशमुख, सुनीता गोरे, लता पवार, मीरा पाचपोर, प्रमोदिनी कोल्हे, सुनील धाबेकर, सुलभा दुतोंडे , बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता केने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ‘या’ गावांत
बांधणार बाजार ओटे!
अकोला तालुका : बाभूळगाव, बोरगावमंजू, चांदूर, दहीहांडा, कुरणखेड, उगवा, कानशिवणी, आपातापा.
अकोट तालुका : अकोली जहाँगीर, अकोलखेड, कुटासा, मुंडगाव, पणज.
बाळापूर तालुका : हातरुण, लोहारा, पारस, वाडेगाव, व्याळा.
बार्शिटाकळी तालुका : महान, पिंजर.
मूर्तिजापूर तालुका : हातगाव, कुरुम, माना, सिरसो.
पातूर तालुका : आलेगाव, शिर्ला, सस्ती, विवरा.
तेल्हारा : अडगाव बु., हिवरखेड, दानापूर.
अखर्चित निधीतून
कामांचे नियोजन करा!
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत अखर्चित असलेल्या निधीतून विकासकामांचे तातडीने नियोजन करून निधी खर्च करण्याचे बांधकाम समितीच्या सभेत ठरविण्यात आले.