बाजारपेठ, किराणा, हॉटेल्स, पर्यटन चालतं, मग शिकवणी वर्ग का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:39+5:302021-07-05T04:13:39+5:30

कोरोनामुळे गत वर्षापासून शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा-महाविद्यालयांसोबतच शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन ...

Markets, groceries, hotels, tourism, then why not teaching classes? | बाजारपेठ, किराणा, हॉटेल्स, पर्यटन चालतं, मग शिकवणी वर्ग का नाही?

बाजारपेठ, किराणा, हॉटेल्स, पर्यटन चालतं, मग शिकवणी वर्ग का नाही?

Next

कोरोनामुळे गत वर्षापासून शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा-महाविद्यालयांसोबतच शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक विषयांमधील अडचणी सोडविता येत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना, अभ्यास समजत नाही किंवा शिक्षकांना समजावून सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे काहीतरी थातूरमातूर शिक्षण सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने अनेक बाबींना परवानगी दिली आहे. बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. किराणा दुकाने, मॉल्स, हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. पर्यटन स्थळांवर गर्दी होत आहे. एवढेच नाहीतर वाईनबार, बीअरबारमध्ये सुद्धा गर्दी होत आहे. यातून कोरोना पसरत नाही का? मग शिकवणी वर्गातून तो कसा पसरतो? असा सवाल करीत, शिकवणी वर्ग संचालकांनी, शासनाने सभागृह क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास परवानगी द्यावी. आम्ही सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ. शासनाने विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता, विद्यार्थी व शिक्षक हिताचा निर्णय घ्यावा. अशी मागणीही शिकवणी वर्ग संचालकांनी केली आहे. चर्चासत्राला लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आलोक शर्मा उपस्थित होते. प्रास्ताविक करताना, लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी, कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्था बदलत आहे का? शिक्षण हे व्यक्तीला संस्कारित करण्याचे शस्त्र आहे. त्यामुळे शिक्षण थांबू नये. असे विचार व्यक्त केले.

फोटो:

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने अनेकांना सूट दिली आहे. परंतु शिकवणी वर्ग बंद आहेत. शिकवणी वर्गातूनच विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण दिले जाते. शिकवणी वर्ग बंद असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिकवणी वर्गांवर आधारित इतर व्यवसाय सुद्धा ठप्प झाले आहेत. त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. आम्ही दरवर्षी ४८ टक्के कर भरतो. शासनाने यातून आम्हाला सूट द्यावी. हॉटेल्स, बाजारपेठ, पर्यटन सुरू आहे. मग शिकवणी वर्ग का बंद आहेत. शासनाने आम्हाला परवानगी द्यावी.

-प्रा. अजय देशपांडे, मिग्ज कोचिंग क्लासेस

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचे नुकसान होत आहे. अनेकांकडे स्मार्ट फोन नाहीत. नेटवर्क नाही. मुले घरांमध्येच आहेत. मुले, शिक्षकांमध्ये समन्वय नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या अडचणी सोडविता येत नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना, शासनाने ५० टक्के विद्यार्थी क्षमतेनुसार आम्हाला शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी. शिकवणी वर्गाशी निगडीत अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. इतर ठिकाणी गर्दी वाढत आहे. मग शिकवणी वर्गांनाच का प्रतिबंध?

-प्रा. विवेक शास्त्रकार, फिजिक्स पॉईंट काेचिंग क्लासेस

शिकवणी वर्गातून शिक्षकांना मोठा आर्थिक लाभ होतो. असा अनेकांचा समज आहे. परंतु दीड वर्षापासून शिकवणी वर्ग बंद आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. सुविधा, कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे? सर्वाधिक आम्ही शिक्षक भरतो. शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी अनेक निवेदन दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परंतु शासन शिक्षणाविषयी गंभीर नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता, शासनाने शिकवणी वर्ग सुरू करावेत. आम्ही नियमांचे पालन करू.

-प्रा. दीपक पठाडे, अध्यक्ष विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थी संघ

शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद आहेत. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पुढे काय? असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे. कोरोनामुळे यंदा परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या एका पिढीचं मोठं नुकसान झालं आहे. मागील वर्षांपासून परीक्षा नाहीत. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा घेण्यास महत्त्व द्यावे. शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप कमी करून त्यासाठी स्वायत्त मंडळ स्थापन करावे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या घेण्याच्या दृष्टिकोनातून जम्बो परीक्षा केंद्र सुरू करावे आणि शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शिकवणी वर्गांना परवानगी द्यावी.

-प्रा. नितीन बाठे, श्री समर्थ कोचिंग क्लासेस

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलं असून, त्याचा शिकवणी वर्गांवर सुद्धा विपरित परिणाम झाला आहे. आता शासनाने अनेक व्यवसायांना परवानगी दिली आहे. त्याचा पृष्ठभूमीवर शिकवणी वर्गांना सुद्धा परवानगी द्यावी. हॉलच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास शासनाने आम्हाला परवानगी द्यावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करावा.स्पर्धा परीक्षा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना पसरत नाही. परंतु शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थितीतून कोरोना पसरतो. हा गैरसमज आहे. आम्ही नियमांचे पालन व पूर्ण खबरदारी घेऊ. शासनाने आम्हाला परवानगी द्यावी.

-प्रा. विशाल सारडा, संचालक सारडा करियर पॉईंट

आता कोरोनाचा प्रभाव ओसरला आहे. शासनाने हॉटेल्स, वाईनबार, पर्यटनाला परवानगी दिली आहे. याठिकाणी गर्दी होते. यातून कोरोना पसरत नाही. मग शिकवणी वर्गांना परवानगी दिल्यानेच कोरोना कसा पसरतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, त्यांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी आहे. शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शासनाने खेळ करू नये. हॉलच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास शासनाने आम्हाला परवानगी द्यावी. यासोबतच ऑनलाइन/ऑफलाइन शिक्षणाकडे शासनाने लक्ष द्यावे. ज्यांना ऑनलाइन/ऑफलाइन शिक्षण घ्यायचं असेल ते विद्यार्थी घेतील.

-प्रा. भालचंद्र सुर्वे, संचालक सिद्धांत कोचिंग क्लासेस

शासनाने बाजारपेठ, किराणा, हॉटेल्स, पर्यटनासोबतच इतर व्यवसायांना परवानगी दिली. मग विद्यार्थ्यांच्या शिकवणीला परवानगी का नाही? आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायला तयार आहोत. ऑनलाइन शिक्षणाच्या तुलनेत प्रत्यक्ष शिकवणीद्वारे विद्यार्थी घडतात. त्यांच्या शैक्षणिक अडचणी, समस्या सोडविल्या जाऊ शकतात. जोपर्यंत शिक्षक, विद्यार्थी संपर्कात येणार नाहीत. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनाने शिकवणी वर्ग सुरू करावे. शिकवणी वर्ग सुरू झाले तर इतर व्यवसायांना सुद्धा चालना मिळेल.

-प्रा. शिवशंकर खोटरे, आयडियल कोचिंग क्लासेस

Web Title: Markets, groceries, hotels, tourism, then why not teaching classes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.