खारपाणपट्टय़ात ‘मारोडी बंधारा पॅटर्न’ राबविणार!
By admin | Published: August 21, 2015 01:08 AM2015-08-21T01:08:47+5:302015-08-21T01:08:47+5:30
जिल्हाधिका-यांची ग्वाही ; मारोडी येथे बंधा-याचे जलपूजन.
अकोला: खारपाणपट्टय़ातील जिल्हय़ातील मारोडी येथे सिमेंट बंधारा बांधण्याचा नवा प्रयोग यशस्वी झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या पडताळणी करून, शेतकर्यांना संरक्षित ओलिताची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात ह्यमारोडी बंधारा पॅटर्नह्ण राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मारोडी येथे ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्यातील जलपूजनप्रसंगी पत्रकारांशी जिल्हाधिकारी बोलत होते. खारपाणपट्टय़ातील मारोडी येथे सिमेंट नाला बंधार्याच्या कामातून नवा प्रयोग करण्यात आला आहे. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या बंधार्याच्या क्षेत्रात दोन साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत. मरोडा येथील सिमेंट बंधार्यामुळे या भागातील शेतकर्यांना संरक्षित ओलिताची सोय सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतकर्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पडताळणीनंतर अशाच प्रकारचे सिमेंट बंधारे जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात बांधण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही जी. श्रीकांत यांनी सांगितले. तत्पूर्वी मारोडी येथील सिमेंट बंधार्याचे जलपूजन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष टाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, गटविकास अधिकारी डी.एस. बचुटे,जिल्हा परिषद सदस्य निकिता रेड्डी, पंचायत समिती सभापती गंगूबाई धामोळे, पंचायत समिती सदस्य रामचंद्र घावट, सरपंच उषा खोडके, उपसरपंच सुशिला खोडके, शाखा अभियंता डी.एस. रणबावरे, ग्रामसेवक संजय खर्चान उपस्थित होते.