मंगल कार्यालय ‘बुकिंग’ची रक्कम परत देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:08 AM2020-05-13T10:08:29+5:302020-05-13T10:09:16+5:30
मंगल कार्यालय संचालकांकडे कोट्यवधीची थकीत असून, ही रक्कम काढण्यासाठी वधू-वर पक्षांच्या मंडळींना कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एप्रिल-मे महिन्यातील होणाऱ्या लग्नासाठी मंगल कार्यालय ठरविण्यात आले होते. त्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम देण्यास अकोल्यातील मंगल कार्यालय संचालक टाळाटाळ करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात आता पोलीस तक्रार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील दोनशे मंगल कार्यालय संचालकांकडे कोट्यवधीची थकीत असून, ही रक्कम काढण्यासाठी वधू-वर पक्षांच्या मंडळींना कसरत करावी लागत आहे.
कोरोना महामारीच्या लॉकडाउनचा प्रभाव लग्नसमारंभाच्या उद्योग साखळीवरही मोठ्या प्रमाणात पडला आहे. एप्रिल-मे या उन्हाळ््यांच्या सुट्यांमध्ये काढण्यात आलेले शेकडो लग्नसमारंभ आता अडचणीत आले आहे. अनेकांनी लग्नाच्या तिथी पुढे ढकलल्या, तर काहींनी मोजक्या नातेवाइकांमध्येच लग्न उरकवले आहे; मात्र लग्नसमारंभासाठी केलेल्या मंगल कार्यालयांची बुकिंग आता डोकेदुखी ठरत आहे. अकोला शहरात लहान-मोठी ५० मंगल कार्यालये आहेत. चार लाख रुपयांपासून तर पंचवीस हजार रुपये रोज या प्रकारे मंगल कार्यालयांचे भाडे आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील मंगल कार्यालये कमी दर्जाचे आणि उण्या सुविधेचे आहेत. तरीही दीड-दोन लाख रुपये रोजपर्यंतचे मंगल कार्यालय ग्रामीण विभागात सेवारत आहेत.
मार्च ते डिसेंबर महिन्यापर्यंत यंदा लग्नाच्या तिथी दाट असल्याने मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालयांची बुकिंग झाली. मार्चमध्येच कोरोना महामारीचा उद्रेक झाला. २२ मार्चपासून लॉकडाउन झाले. ते अजूनही उठलेले नाही. त्यामुळे शेकडो लग्नसमारंभ अडचणीत सापडले आहे. प्रत्येक मंगल कार्यालयांकडे किमान ५० लग्न समारंभाच्या अॅडव्हान्स बुकिंग झालेले आहे.
यासाठी वधू-वर पक्षांनी लाखो रुपयांच्या रकमा बुकिंगच्या वेळी दिलेल्या आहेत. आता कोरोना लॉकडाउनमुळे लग्नसमारंभ होणे कठीण आहे. त्यामुळे अनेकांनी नियोजित लग्नाच्या तारखा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. तर काहींनी मोजक्या नातेवाइकांच्या साक्षीने लग्न उरकवून टाकले. आता मंगल कार्यालयासाठी बुकिंग केलेली रक्कम मागण्यासाठी वधू-वर पक्ष जाताहेत, तर त्यांना विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. मंगल कार्यालय संचालकांनी आता ही रक्कम पूर्ण देता येणार नाही. आपण पुढची तारीख बुकिंग करू शकता. आपण वºहाडी आणून लग्न लावू शकता. नियमानुसार ही रक्कम देता येत नाही. अशी भाषा आता मंगल कार्यालय संचालकांनी सुरू केली आहे.
मंगल कार्यालय चालविणे सोपे नाही. वºहाडी मंडळीने लग्न पुढे ढकलावेत. मोजक्या नातेवाइकांमध्ये लग्न लावावेत. बुकिंगसाठी घेतलेली रक्कम मंगल कार्यालय संचालकांनी घरात ठेवलेली नाही. त्यामुळे या रकमेच्या परताव्यासाठीदेखील काही वेळ द्यायला हवा.
- सुभाष चांडक, मंगल कार्यालय संचालक, अकोला.
मंगल कार्यालय संचालकांनी थेट रक्कम देण्यास टाळाटाळ करणे चुकीचे आहे. मला बुकिंगची रक्कम मिळविण्यासाठी वाद घालावा लागला. वेळप्रसंगी प्रकरण पोलीस ठाण्यातदेखील जाऊ शकते.
- दिलीप म्हैसने,
वधूूचे पिता, अकोला.
जर मंगल कार्यालयाचे संचालक बुकिंगची रक्कम देत नसतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर तक्रार करावी. आपत्कालीन परिस्थितीमुळे रक्कम बुडविता येणार नाही. याबाबत तक्रार आल्यास नियम करता येईल,
-प्रा. संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी