‘सिकलसेल’ लपवून केलेला विवाह न्यायालयात रद्द
By admin | Published: June 20, 2017 04:54 AM2017-06-20T04:54:31+5:302017-06-20T04:54:31+5:30
अकोला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सिकलसेलसारखा गंभीर आजार असतानाही विवाहापूर्वी आजाराची माहिती नवर्या मुलापासून लपवून ठेवून त्याच्याशी विवाह झाल्यानंतर संसार थाटण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धुडकावून लावत हा विवाह रद्दबातल ठरविला आहे. विशेष म्हणजे मुलीला हा आजार विवाहापूर्वीपासूनच असल्याचे सिद्ध झाल्याने अकोला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
खामगाव येथील एका युवतीसोबत प्रदीप नामदेवराव अंभोरे यांचा विवाह २00९ मध्ये झाला होता. विवाहाच्या तीन महिन्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने विश्रांतीसाठी माहेरी खामगाव येथे पाठविले होते. तिच्या माहेरहून नवरा मुलगा प्रदीप अंभोरे यांना पत्नीची प्रकृती बिघडल्याचा निरोप देण्यात आला. लगेच विवाहितेला अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तिला सिकलसेल अनेमिया आजार असल्याचे स्पष्ट केले. आजार बरा होणारा नसल्याने विवाहितेच्या पतीने तिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून अकोला येथील कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायद्यानुसार याचिका दाखल केली होती. या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रदीप अंभोरे यांची याचिका फेटाळून विवाहितेच्या बाजूने निकाल दिला होता. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला प्रदीप अंभोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिल्यानंतर खंडपीठात सुनावणी झाली. वासंती ए. नाईक आणि स्वप्ना जोशी या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठात दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाल्यानंतर मुलीला सिकलसेल हा गंभीर आजार असल्याने आणि या आजाराविषयीची माहिती विवाहापूर्वी नवर्या मुलाला न दिल्याने त्याची फसवणूक झाली, असे सांगून घटस्फोटच नव्हे तर हा विवाह रद्द करण्याचे आदेश दिले.