सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:31 PM2019-03-30T13:31:32+5:302019-03-30T13:31:37+5:30
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी एका विवाहितेने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळापायी आत्महत्या केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली.
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी एका विवाहितेने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळापायी आत्महत्या केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली असून, पोलिसांनी सदर सासरच्या मंडळीविरुद्ध विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करणे तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; मात्र ही हत्या असल्याचा आरोप करीत मुलीच्या वडिलांनी २६ मार्च रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
पळसो बढे येथील रहिवासी गणेश शहादेवराव काळे यांची मुलगी आरती हिचा विवाह कौलखेडमधील रहिवासी प्रवीण नागे याच्यासोबतच दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर या दोघांना एक मुलगा झाल्यानंतर तिचा पती प्रवीण नागे, सासरा भास्कर नागे, सासू सुनंदा नागे व प्रवीणची सीमा नामक बहीण माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. हुंडा कमी दिल्यामुळे दुचाकी घेण्यासाठी आणखी पैशाची मागणी आरतीच्या सासरच्या मंडळींनी सुरू केली होती. हा प्रकार आरतीने तिच्या माहेरी सांगितला; मात्र त्यानंतर त्यांच्यात बैठक होऊन यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्यातील वाद पुन्हा सुरू झाल्याने आरतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नागे कुटुंबीयांनी काळे यांना मोबाइलवर दिली. आरतीचे वडील व नातेवाईक कौलखेड येथे येईपर्यंत गळफास घेतलेल्या आरतीचा मृतदेह काढून खाली जमिनीवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात संशय निर्माण होत असून, आरतीचे वडील यांनी पोलीस अधीक्षकांना २६ मार्च रोजी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.