ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजींना सेवाश्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:47 AM2017-11-21T01:47:46+5:302017-11-21T01:51:11+5:30

२२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Marshitwar Guruji received the service award | ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजींना सेवाश्री पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजींना सेवाश्री पुरस्कार प्रदान

Next
ठळक मुद्दे दुसर्‍यांसाठी जगण्यातच खरे समाधान - डॉ. भांडारकर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनुष्य आयुष्यभर स्वत:साठी जगत असतो. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा मिळविण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. अनेकांना तर ज्ञानाचा, सौंदर्याचा, पैशांचा अहंकार असतो; परंतु जगाचा निरोप घेताना, सर्वकाही येथेच सोडून जावे लागते. जगज्जेता सिकंदरसुद्धा जाताना काहीच सोबत नेऊ शकला नाही. त्यामुळे स्वत:साठी जगण्यापेक्षा, दु:खी, पीडित लोकांसाठी जगावे, यातच खरे समाधान आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. के.एम. भांडारकर यांनी व्यक्त केले. 
२२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. विचारपीठावर सत्कारमूर्ती म्हणून वाशिमचे ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी, सेवाश्रीचे संयोजक विजय सत्यनारायण रांदड होते. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मारशेटवार गुरुजी, त्यांच्या धर्मपत्नी शोभा मारशेटवार, चिरंजीव रवी व अविनाश यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी डॉ. भांडारकर म्हणाले, स्मशानभूमीमध्ये फारसे कोणी जात नाही; परंतु विदारक अशा स्मशानभूमीमध्ये मारशेटवार गुरुजी यांनी जाऊन, लोकांकडून पैसा गोळा करून स्मशानभूमीचा विकास घडवून आणला आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर स्मशानभूमीचे निर्माण केले. हे दुर्मिळ कार्य आहे. ते संस्कृती टिकविण्याच्या मार्गावरील पथदीप आहेत, अशा शब्दात त्यांनी मारशेटवार गुरुजींच्या कार्याची स्तुती केली. कार्यक्रमाला डॉ. नानासाहेब चौधरी, महादेवराव भुईभार, डॉ. राजीव बियाणी, गोपाल खंडेलवाल, प्रकाश वाघमारे, पत्रकार संदीप भारंबे यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे प्रा. राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब, हरिश मानधने आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे शुभांगी रांदड, शकुंतला रांदड, नीलेश मालपाणी, अनिल भुतडा, दीपक रांदड, राज रांदड यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सेवाश्रीचे संयोजक विजय रांदड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शारदा बियाणी, प्रा. डॉ. किरण वाघमारे यांनी करून दिला. बहारदार संचालन नीशा पंचगाम यांनी केले. आभार शुभम रांदड याने मानले. (प्रतिनिधी) 

समाजऋण फेडण्याचा प्रयत्न: मारशेटवार गुरुजी
ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. निसर्ग, समाजातून आपल्याला खूप काही मिळते; परंतु मनुष्य नुसते, घेण्याचे काम करतो, देण्याचे नाही. समाजाने दिलेले आपल्याला परत करायचे आहे, या विचाराने मी शिक्षक सेवेचा वसा सांभाळत, समाज कार्याला सुरुवात केली. लोकांनी माझ्या झोळीत टाकलेल्या पैशांतून स्मशानभूमीचा विकास केला. पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे काम करतो. अशा शब्दात माधवराव मारशेटवार गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्कार व्यक्तीचा नाही तर कार्याचा- प्रा. खडसे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी दु:खी, कष्टी, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी देह झिजविला. पैसा तर सर्वच कमावितात; परंतु समाधान केवळ दुसर्‍यांसाठी जगणारे मिळवितात. देवळात जाऊन समाधान मिळत नाही. गोरगरीब, गरजूंची सेवा करण्यात खरे समाधान मिळते आणि सत्कार कधीच व्यक्तीचा होत नाही. त्याने केलेल्या कार्याचा नेहमी गौरव होतो, असे मनोगत प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. 

Web Title: Marshitwar Guruji received the service award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.