अकोल्यातील हुतात्मा स्मारकाचा होणार कायापालट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:52+5:302021-08-15T04:20:52+5:30
संतोष येलकर अकोला : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाचे रक्षण करताना युध्दात शहीद झालेल्या जिल्ह्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अकोल्यातील नेहरू ...
संतोष येलकर
अकोला : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाचे रक्षण करताना युध्दात शहीद झालेल्या जिल्ह्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अकोल्यातील नेहरू पार्कजवळील हुतात्मा स्मारकाचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीतून अद्ययावत स्मारक उभारणीचे सुरू करण्यात आलेले काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेऊन हुतात्मा झालेल्या तसेच देशाचे रक्षण करताना युध्दात सहभाग घेऊन शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींची जोपासना करण्यासाठी अकोला शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नेहरू पार्कजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाचा कायापालट करून अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हुतात्मा स्मारक अद्ययावत करण्याच्या कामासाठी १ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उपलब्ध निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हुतात्मा स्मारक अद्ययावत करण्याचे काम ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या वर्षभरात अद्ययावत हुतात्मा स्मारक उभारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
असे साकारणार अद्ययावत हुतात्मा स्मारक!
अकोल्यातील हुतात्मा स्मारक अद्ययावत करण्याच्या कामात हुतात्मा स्मारकात प्रेरणा स्तंभ, युध्दात शहीद झालेल्या जिल्ह्यातील शहिदांचे पुतळे व त्यांच्या जीवनकार्याची माहिती, उद्यान, नाइट लाइट शो, ऑडिओ व व्हिडीओ सुविधा आणि लहान मुले व नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था आदी अद्ययावत सुविधांच्या कामांतून हुत्मात्मा स्मारक साकारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
.....................फोटो...............................