मासा ग्रामपंचायतने दोन लग्नसमारंभ केले रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:26 AM2020-03-25T11:26:41+5:302020-03-25T11:26:50+5:30
दोन्ही लग्नसमारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरगाव : तालुक्यातील सिसा-मासा उदेगाव गट ग्रामपंचायतने मासा गावात २९ व ३१ मार्च रोजी होणारे लग्न समारंभ रद्द केले आहे. हे लग्नसमारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. लग्नसमारंभांमधील होणारी गर्दी पाहता, ग्रामपंचायतने खबरदारी म्हणून हे दोन्ही लग्नसमारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मासा येथील प्रेम पुण्या घोसले यांचा विवाह सोहळा २९ मार्च रोजी सपना पवार रा. धमोरी आणि उमेश सिकंदर पवार रा. घोडेगाव यांचा विवाह मासा येथील लक्ष्मी पुण्या घोसले यांच्याशी ३१ मार्चला होणार होता. मात्र सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिसा-मासा ग्रामपंचायतच्या सरपंच इंदिरा फाले, सचिव विलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य सतीश फाले यांनी वधू पित्यास परिस्थिती गांभीर्य अवगत करून देत, लग्नसमारंभ रद्द करून पुढे घेण्याची विनंती केली. त्यांनीही ही विनंती मान्य करीत, लग्नसमारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्देशानुसार २४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत संचारबंदी आहे. संचारबंदीमध्ये ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरपंच इंदिरा फाले यांनी केले आहे. (वार्ताहर)