खंडणीखोरांनी कट रचून घडविले हत्याकांड
By admin | Published: July 2, 2014 12:22 AM2014-07-02T00:22:45+5:302014-07-02T00:31:18+5:30
रायली जीन परिसरातील मंगलदास मार्केटमध्ये घडलेले हत्याकांड हे पूर्वनियोजित कट रचून घडविण्यात आले
अकोला : रायली जीन परिसरातील मंगलदास मार्केटमध्ये घडलेले हत्याकांड हे पूर्वनियोजित कट रचून घडविण्यात आले असून, आरोपी हे बाजारपेठमध्ये खंडणी वसूल करतात, असा आरोप हत्याकांडातील साक्षीदार आणि जखमी शेख सलीम शेख बुर्हान नौरंगाबादी यांनी मंगळवारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. हे पत्र त्यांनी जिल्हाधिकार्यांनाही सादर केले आहे.
मंगलदास मार्केटमध्ये २६ जून रोजी घडलेल्या सशस्त्र संघर्षात शेख अक्रम शेख बुर्हान नौरंगाबादी यांचा खून करण्यात आला. तसेच शेख सलीम शेख बुर्हान नौरंगाबादी, महेबूब खान ऊर्फ मब्बा हे दोघे जखमी झाले. शेख साजिद शेख सुलतान, शेख सुलतान शेख यासीन, शेख रशीद शेख सुलतान, शेख आरीफ शेख आमद, शेख नईम शेख गफूर, शेख रहीम शेख गफूर आणि शेख फरीद पहेलवान यांनी खून केल्याचा आरोप जखमी सलीम यांनी पत्रात केला आहे. हत्याकांडातील आरोपी हे अवैध सावकारीच्या धंद्यात गुंतले असून, त्यांच्या दादागिरीमुळे बाजारपेठेतील व्यापारी त्रस्त झाले आहेत, असा आरोप सलीम यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे आरोपींवर कठोर कावाईची मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
** आरोपीचे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी प्रयत्न
हत्याकांडातील आरोपी तथा माजी नगरसेवक शेख फरीद हा आपल्या सर्मथकांमार्फत घटनेच्या दिवशी आपण रुग्णालयात भरती असल्याचे डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सलीम यांनी पत्रात म्हटले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्याला काही नगरसेवक हे मदत करीत असल्याचेही सलीम यांचा दावा आहे. शेख फरीदची पत्नी शमशाद या मनापा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आल्या आहेत.