मुलीची राजस्थानात विक्री प्रकरणातील मास्टरमाईंड महिला जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2023 07:26 PM2023-12-06T19:26:52+5:302023-12-06T19:27:42+5:30
अमरावती पोलिसांनी अकोल्यातून केली अटक.
अकोला: अमरावती शहरातील नवसारी येथील एका १७ वर्षीय मुलीस राजस्थान येथे १ लाख ३० हजार रूपयांमध्ये विक्री केल्याची घटना फेब्रुवारी २०२३ मध्ये घडली. या प्रकरणात १० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणातील मास्टरमाईंड महिलेस अमरावती शहरातील कोतवाली पोलिसांनी अकोल्यातून बुधवारी दुपारी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार अकोल्यातील शिवणी परिसरात राहणारी महिला नेहा इंगळे(३१), संतोष इंगळे, प्रविण राठोड, चंदा राठोड, मुकेश राठोड आदी आरोपींनी अमरावती नवसारी येथील १७ वर्षीय मुलीस फूस लावून राजस्थान येथे पळवून नेले होते. तेथे तिची एका कुटूंबाला १ लाख ३० हजार रूपयांमध्ये विक्री करून तिचे लग्न लावून दिले होते. यावेळी मुलीसाेबत मानलेला भाऊ आकाश विरूळकर(२४) हा सुद्धा होता. परंतु तो राजस्थानात अचानक बेपत्ता झाला आणि नंतर तो मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे ही मुलगी घाबरली आणि तातडीने तिने अमरावती गाठत, पोलिसांना आपबिती कथन केली.
त्यानुसार अकोल्यातील महिला नेहा इंगळेसह तिच्या साथीदारांविरूद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. इतर आरोपींना अटक केली. परंतु नेहा इंगळे गेल्या १० महिन्यांपासून फरार होती. ती अकोल्यात असल्याची माहिती अमरावती कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर, एपीआय वाकोडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने अकोल्यात पोहोचत, सिव्हिल लाइन पोलिसांच्या मदतीने तिला मोठी उमरीतून ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.