प्रसूती विभाग अस्वच्छतेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:20 AM2017-07-21T01:20:48+5:302017-07-21T01:20:48+5:30
सर्वोपचार रुग्णालय : स्वच्छतागृहांची दैनावस्था; रुग्णांची कुचंबणा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. रुग्णालयातील सर्वच विभागांमध्ये अस्वच्छता दिसून येत असली, तरी प्रसूती विभागात मात्र अस्वच्छतेने कळस गाठला आहे. त्यामुळे रुग्णांसोबतच या विभागात कार्यरत डॉक्टर, इन्टर्न्स व परिसेविकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय व तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आणि गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही मोठ्या संख्येने गरोदर महिला प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथे प्रसूतीशास्त्र विभागाचे तीन युनिट असून, खाटांची संख्या ६५ एवढी आहे.
तिन्ही युनिटमध्ये नेहमीच खाटांपेक्षा प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या अधिक असते. तिन्ही युनिटमध्ये स्वच्छता ठेवल्या जात असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही. रुग्णांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
त्यामुळे संपूर्ण विभागात दुर्गंधीचे वातावरण असते. याचा परिणाम रुग्णांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.