गणिताच्या पेपरला तब्बल २0 कॉपीबहाद्दर निलंबित
By admin | Published: March 11, 2016 03:07 AM2016-03-11T03:07:37+5:302016-03-11T03:07:37+5:30
अकोला जिल्ह्यातील एकाच केंद्रावर १७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.
अकोला: इयत्ता दहावीच्या गणित विषयाच्या पेपरदरम्यान शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी घातलेल्या धाडीत तब्बल २0 कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. किनखेड पूर्णा येथील संत तुकाराम विद्यालय परीक्षा केंद्रावर सर्वाधिक १७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र संचालक व पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल अमरावती विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या पृष्ठभूमिवर शासनस्तरावर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असले, तरी त्याला विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे परीक्षेदरम्यान दिसून येत आहे. शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी केलेल्या कारवाईदरम्यान जिल्हय़ातील विविध परीक्षा केंद्रांवर आतापर्यंंत ३७ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. सातत्याने कारवाई होत असतानासुद्धा अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहेत. गुरुवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांंच्या भरारी पथकाने दर्यापूर मार्गावरील किनखेड पूर्णा येथील संत तुकाराम विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून १७ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडले. याच पथकाने दहीहांडा येथील रूपनाथ विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून २ विद्यार्थ्यांंना निलंबित केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाने कानशिवणी येथील तुकाराम इंगोले विद्यालय येथे धाड घालून एका विद्यार्थ्यांंस निलंबित केले. शनिवारी दहावीचा विज्ञान (१) विषयाचा पेपर आहे. याही पेपरला भरारी पथकांचा परीक्षा केंद्रावर वॉच राहणार आहे.