माथाडी मंडळाचे पथक करणार गैरप्रकाराची चौकशी
By admin | Published: January 6, 2017 02:36 AM2017-01-06T02:36:38+5:302017-01-06T02:36:38+5:30
नोंदणी न करणार्यांना नोटिस दिली जाणार; जिल्हाधिका-यांनीही घेतली दखल.
अकोला, दि. ५- रक्ताचे पाणी करून अंगा-खांद्यावर पोत्यांचे ओझे वाहणार्या माथाडी कामगारांची नोंद न करता तुटपुंजा मजुरीवर त्यांची बोळवण करणार्यांना नोटिस देत नोंदणी न केल्याची विचारणा करण्यात येईल. सोबतच रेल्वे मालधक्क्यावर घडत असलेल्या प्रकाराबाबत माथाडी मंडळाची पथके घटनास्थळावर कामाच्या वेळी प्रत्यक्ष चौकशी करतील, असे अकोला विभागीय माथाडी मंडळाचे अध्यक्ष व्ही.आर. पाणबुडे यांनी सांगितले.
कोणत्याही ठिकाणी श्रमजीवी काम करणार्यांच्या हिताचे, आरोग्याचे रक्षण करणारा कायदा अकोला जिल्हय़ात कागदावरच उरला आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने बुधवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाली. यावेळी शिवणी रेल्वेधक्क्यावर एकाच वेळी १८0 कामगार ५८ रॅकमधून धान्याची पोती रिकामी करीत होते. त्यावेळी जड वाहतूक करणारे किमान २२ वाहने धक्क्यावर होती. त्याचवेळी ते धान्य उतरून गोदामात साठा करण्यासाठी १५0 पेक्षाही अधिक माथाडी कामगार राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होते. या दोन ठिकाणची संख्या पाहता ती चारशेच्या जवळपास आहे. त्या कामगारांची कुठेच नोंद नाही, हे उघड झाले. माथाडी मंडळात प्रत्यक्ष ४२ कामगारांची नोंद करण्यात आली. त्यातून दरमहा ४ लाख ५0 हजारांपेक्षाही अधिक रकमेच्या लेव्हीचे नुकसान होत असल्याचेही मांडण्यात आले. माथाडी कायद्यानुसार कामगारांचे कल्याण, आरोग्य आणि इतर सुरक्षिततेसाठी मंडळात नोंद करणे बंधनकारक आहे. माथाडी समस्या निकाली काढणार्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी याकडे लक्ष दिल्यास कामगार कल्याण साधले जाईल, अशी कामगार संघटनेची मागणीही पुढे आली. त्याची दखल घेत अकोला-वाशिम-बुलडाणा विभाग माथाडी मंडळ अध्यक्ष, सहायक कामगार आयुक्त व्ही.आर. पाणबुडे यांनी चौकशी करण्यासाठी पथके, तसेच नोंदणी न केलेल्यांना नोटिस देण्यात येत आहे, असे सांगितले.
माथाडी मंडळ अध्यक्षांना कामगारांच्या कामाचे दर निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बैठक घेण्यात येत आहे. त्या बैठकीत रेल्वे मालधक्का, राज्य वखार महामंडळ गोदामात अनोंदीत कामगारांना प्रवेश देणे, त्यांच्या लेव्हीची रक्कम न भरणे, माथाडी कायद्याचे पालन न होणे, यावर सविस्तर अहवाल मागविण्यात येईल.
- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी.