उर्दू माध्यमांत विकसित केला गणित विषयाचा क्यूआर कोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:50+5:302020-12-30T04:25:50+5:30
पातूर : संपूर्ण जग काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले असताना काेराेना प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील सर्व शाळा-कॉलेजेस ...
पातूर : संपूर्ण जग काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले असताना काेराेना प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील सर्व शाळा-कॉलेजेस बंद होती. अशा संकटाच्या परिस्थितीत विद्यार्थी ऑनलाइन धडे घेत असताना पातूर येथील शाहबाबू उर्दू हायस्कूलच्या सलमान वकार खान या गणित विषयाच्या शिक्षकाने उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी उर्दू माध्यमांत गणित विषयाचा क्यूआर कोड विकसित केला आहे.
काेराेनाच्या संकटकाळात अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइनच शिक्षणाचे धडे दिले. अशा विपरीत परिस्थितीतही ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य चालूच ठेवले.
ऑनलाइन शिक्षणाचे धडे अधिक सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने सलमान वकार खान यांनी गणित विषयाचा क्यूआर कोड विकसित केला. हा क्यूआर कोड प्रत्येक घटक, प्रत्येक टॉपिक व प्रत्येक स्वाध्याय संचावर विकसित करण्यात आला आहे. हा क्यूआर कोड विद्यार्थ्यांना संबंधित घटकाच्या ठिकाणी चिकटवावा लागणार आहे. ज्यामुळे जो घटक विद्यार्थ्यांच्या अध्यापनादरम्यान समजलेला नाही त्या घटकाच्या क्यूआर कोडला स्कॅन करून विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. सलमान वकार खान यांनी विकसित केलेल्या क्यूआर कोडमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या निश्चितच सुटू शकतील, अशी आशा बाळगत शाहबाबू एज्युकेशन सोसायटीचे सचिव सय्यद इसहाक राही यांनी सलमान वकार खान यांचे काैतुक केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व उर्दू माध्यमांच्या इतर शिक्षकांनीही सलमान वकार खान यांना शुभेच्छा दिल्या.
कठीण समजल्या जाणाऱ्या गणित विषयात सलमान वकार खान यांनी उर्दू माध्यमांमध्ये क्यूआर कोड विकसित करून ऑनलाइन शिक्षण क्षेत्राला क्यूआर कोडच्या रूपाने एक मोलाचे योगदान दिले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.