शिष्यवृत्ती परीक्षेत गणित, बुद्धिमत्तेचा वरचष्मा!

By Admin | Published: September 14, 2016 12:30 AM2016-09-14T00:30:39+5:302016-09-14T00:30:39+5:30

शिष्यवृत्ती परीक्षा आता नव्या स्वरूपात होणार असून तीन पेपरऐवजी होणार दोनच पेपर.

Mathematics in scholarship exams! | शिष्यवृत्ती परीक्षेत गणित, बुद्धिमत्तेचा वरचष्मा!

शिष्यवृत्ती परीक्षेत गणित, बुद्धिमत्तेचा वरचष्मा!

googlenewsNext

ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. १३ : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च २0१६-१७ मध्ये इयत्ता चौथी व सातवी ऐवजी इयत्ता पाचवी व आठवीमध्ये घेण्यात येणार आहे. सोबतच या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूपदेखील बदलण्यात आले असून, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता विषयांवर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीन स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेत गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा वरचष्मा राहणार आहे.
इयत्ता चौथी व सातवीसाठी आतापर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती; मात्र २0१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे.
२0१६-१७ या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच तीन पेपरऐवजी दोनच पेपर ठेवण्यात आले आहेत. या नव्या स्वरूपाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी गुण वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी ७0 गुण ठेवण्यात आले होते; परंतु आता नव्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी १00 गुण ठेवण्यात आले आहेत.
यापूर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे ३00 गुणांसाठी तीन पेपर घेण्यात येत होते. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी भाषा व ३0 गुणांसाठी इंग्रजी विषय होता. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेत ७0 गुणांसाठी गणित व ३0 गुणांसाठी परिसर अभ्यास या विषयांचा समावेश होता, तर तिसर्‍या प्रश्नपत्रिकेत ७0 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी व ३0 गुणांसाठी उर्वरित परिसर अभ्यास या विषयांचा समावेश होता. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिके मध्ये ८0 गुणांसाठी भाषा व २0 गुणांसाठी इंग्रजी विषय होता. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी गणित व ३0 गुणांसाठी सामाजिक शास्त्र आणि तिसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी व ३0 गुणांसाठी सामान्य विज्ञान विषयाचा अंतर्भाव होता.


असे आहे शिष्यवृत्ती परीक्षेचे नवीन स्वरूप
१. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रथम भाषा ५0 गुण व गणित विषयासाठी १00 गुण.
२. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये तृतीय भाषा ५0 गुण व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी १00 गुण.

अशी राहिल बुद्धिमत्ता चाचणी
बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३0 टक्के गुणांचे राहणार असून मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४0 टक्के तर कठीण स्वरूपाचे प्रश्न ३0 टक्के गुणांचे राहणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावात बदल
आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा असे नाव होते; मात्र २0१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला आहे. आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना, या नावाने या परीक्षेस ओळखले जाणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीऐवजी पावचीमध्ये व सातवीऐजवी आठवीमध्ये आयोजित करण्याचे निश्‍चित केल्यानुसार सन २0१६-१७ मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या मराठी माध्यमाकरिता शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त अशी मार्गदर्शिका राज्य परीक्षा परिषदेमार्फत तयार करण्यात आली आहे.
रा. वि. गोधने,
आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे.

Web Title: Mathematics in scholarship exams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.