ओबडधोबड दगडांना बोलकं करणारी माउली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:57+5:302021-05-23T04:17:57+5:30
अकोला : अनेकांच्या अंगी कला ही उपजतच असते. त्यासाठी कोणतेही शिक्षण घ्यावे लागत नाही. दिशा मिळाली की, अंगची कला ...
अकोला : अनेकांच्या अंगी कला ही उपजतच असते. त्यासाठी कोणतेही शिक्षण घ्यावे लागत नाही. दिशा मिळाली की, अंगची कला बहरत जाते. दगडातून मूर्ती घडविण्यासाठी शिल्पकाराला त्यावर अनेक छन्नी, हातोड्याचे घाव घालावे लागतात. मात्र, आजूबाजूला सहज सापडणाऱ्या ओबडधोबड दगडांना मूळ आकारात कोणताही बदल न करता, त्यावर विविध रंगांची उधळण करून निसर्गचित्रे साकारण्याची व त्या दगडांना बोलकं करण्याची किमया अकोटमधील एका माऊलीने केली आहे. ही माउली आहे, मीना रामदास होपळ. मीना होपळ यांचं बीएपर्यंत शिक्षण झालं आहे. पती रामदास होपळ गुरुजी हे सौंदळा येथे जि. प. शाळेचे मुख्याध्यापक. बालपणापासूनच त्यांना कलेची आवड. परंतु कलेचे कोणतीही शिक्षण न घेता, त्यांनी आवडीतून छंद जोपासला. त्यासाठी पतीनेही प्रोत्साहन दिले. कुठे बाहेरगावी गेल्या की, त्यांना आजूबाजूला, गावांतील नदीकाठी ओबडधोबड, गुळगुळीत असणारी दगड दिसायचे. त्यात कलाकृती दिसायची. हे दगड हेरून त्या घरी आणतात. दगडांच्या मूळ आकारात कोणतेही बदल न करता, त्यावर आकर्षक रंगांची उधळण करून निसर्गचित्रे साकारत, आपल्या हातातील कलेने, त्यांनी दगडांना मूर्त रूप देऊन बोलकं केलं. दगडांवर रंगांच्या साहाय्याने अशी काही निसर्गचित्रे साकारली की, त्यांच्या घरात येणारा प्रत्येकजण आधी, या बोलक्यांना दगडांना, त्यावरील कलाकृतीला न्याहाळल्याशिवाय राहत नाही. दगडांवरील त्यांची निसर्गचित्रे मन मोहून घेतात. याशिवाय टाकाऊतून अनेक टिकाऊ वस्तू त्यांनी चितारल्या आहेत. आकर्षक भित्तीचित्र सुद्धा त्यांनी साकारली आहेत.
फोटो: मेल फोटोत
प्लॅस्टिक कॅनमधूनही आकर्षक कलाकृती !
बऱ्याच घरात आपण तेलाच्या कॅन आणतो. तेल संपले की, त्या प्लॅस्टिकच्या कॅन फेकून किंवा भंगारात देतो. परंतु मीना होपळ यांनी प्लॅस्टिकच्या कॅनचा कलाकृती म्हणून उत्कृष्ट वापर केला. प्लॅस्टिकच्या कॅनला त्यांनी बदक, पक्ष्यांचे रूप दिलं. एवढेच नाहीतर विशिष्ट आकार देत, त्यांनी घरात फुलांची झाडे लावण्यासाठी कल्पकतेने प्लॅस्टिक कॅनचा वापर केला आहे.
आदर्श शाळा घडविण्यासाठीही धडपड
पती मुख्याध्यापक असल्याने, मीना होपळ अनेकदा सौंदळ्यातील जि. प. शाळेत जातात. दोघेही शाळेला आदर्श करण्यासाठी धडपड करतात. लोकवर्गणीसह स्वखर्चातून त्यांनी, शाळेची बाग, इमारत, शाळेतील स्वच्छतागृह उभारले आहे. स्वच्छतागृहाची पाहणी करून सीईओ सौरभ कटारिया यांनी तर होपळ दाम्पत्याचं कौतुक केलं होतं. मीना होपळ या पतीसोबत अधूनमधून शाळेत जातात. तेथील स्वच्छतागृह त्या स्वत: स्वच्छ करतात.
शैक्षणिक भित्तीपत्रके, चार्टही करतात तयार
जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना कृतीयुक्त, मूल्यशिक्षण, ज्ञानरचनावादी शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मीनाताई आकर्षक शैक्षणिक भित्तीपत्रके, विविध चार्ट तयार करून पतीच्या अध्यापन कार्यास हातभार लावतात.