बळीराजाला यावे सुगीचे दिवस; खरीप पेरणीपूर्वी शुभेच्छापत्रात प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:24 PM2024-06-08T20:24:23+5:302024-06-08T20:24:31+5:30

महिला काँग्रेसचा अनोखा उपक्रम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविले पत्र

May the days of harvest come to Baliraja; Prayer in greeting card before Kharif sowing! | बळीराजाला यावे सुगीचे दिवस; खरीप पेरणीपूर्वी शुभेच्छापत्रात प्रार्थना!

बळीराजाला यावे सुगीचे दिवस; खरीप पेरणीपूर्वी शुभेच्छापत्रात प्रार्थना!

संतोष येलकर
 
अकोला : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीला लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पेरणीच्या शुभेच्छा देत, बळीराजाला सुगीचे दिवस यावे, अशी प्रार्थना करणारे शुभेच्छापत्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवार, ७ जूनरोजी जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना शुभेच्छापत्र पाठविण्यात आले. यंदाचा पावसाळा सुरू झाला असून, पेरणीलायक पाऊस बरसल्यानंतर जिल्ह्यात लवकरच खरीप पेरणीला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पत्र लिहून खरीप हंगामातील पेरणीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे भरघोस उत्पादन व्हावे, त्यापासून भरपूर उत्पन्न मिळावे आणि बळीराजाला सुगीचे दिवस यावे, अशी प्रार्थना या शुभेच्छापत्रात करण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमात महिला काँग्रेसच्या वतीने ७ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर अंतर्देशीय शुभेच्छापत्र पाठविण्यात आले असून, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना संबंधित शुभेच्छापत्र पाठविण्यात येत असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांनी दिली.
 
पत्र पाठविण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांचे परिश्रम!
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शुभेच्छापत्र लिहिण्यासाठी आणि पोस्टाद्वारे पाठविण्याकरिता महिला काँग्रेसच्या हेमा काळे, अरुणा लबडे, सुषमा मोरे, संगीता आत्राम, सोनाली मोरे, जया देशमुख आदी महिला पदाधिकारी परिश्रम घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष पूजा काळे यांनी सांगितले.
...................................
सर्वांची भूक भागवणारा शेतकरी सुखी व्हावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि बळीराजा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, अशी प्रार्थनाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Web Title: May the days of harvest come to Baliraja; Prayer in greeting card before Kharif sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला