महापौरांनी घेतला आढावा; अकोलेकरांना सुधारणांची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:23 PM2019-12-04T13:23:53+5:302019-12-04T13:24:00+5:30
अकोलेकरांना देण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र असताना अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षाने महापौर पदाची धुरा अर्चना मसने यांच्याकडे सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नवनिर्वाचित महापौर अर्चना मसने यांनी मंगळवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ आढावा घेतला. सुमारे सात तास चाललेल्या आढावा बैठकीतून अकोलेकरांच्या पदरात किमान मूलभूत सुविधा पडतील का आणि यासंदर्भात ठोस अंमलबजावणी कधी होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित करण्यात आला आहे.
तत्कालीन महापौर विजय अग्रवाल यांची प्रशासकीय कामकाजावर चांगलीच पकड होती. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत विविध विकास कामांच्या मुद्यावर विजय अग्रवाल यांची तासन्तास चर्चा होत असली तरी सर्वसामान्य अकोलेकरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या अद्यापही ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.
अकोलेकरांना देण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र असताना अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षाने महापौर पदाची धुरा अर्चना मसने यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सात तासांच्या मंथनातून सर्वसामान्यांना कितपत दिलासा मिळेल, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
बैठकीला आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती विनोद मापारी, सभागृहनेता गीतांजली शेगोकार, माजी महापौर विजय अग्रवाल, झोन सभापती शारदा ढोरे, उपायुक्त वैभव आवारे, शहर अभियंता सुरेश हुंगे, मुख्य लेखाधिकारी मनजित गोरेगावकर, सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे, प्रणाली घोंगे, नगर सचिव अनिल बिडवे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दिलीप जाधव, प्रभारी कार्यकारी अभियंता (यांत्रिकी सहायक) अजय गुजर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सूचना केल्या; अंमलबजावणी कधी?
शहरात पाइपलाइनच्या कामांचा खेळखंडोबा झाला आहे. नळधारकांना वाढीव देयके दिली जात आहेत. ४०० रुपयांत नळ कनेक्शनबद्दल संभ्रम आहे. हातपंप नादुरुस्त आहेत. अतिक्रमकांनी मुख्य रस्ते गिळंकृत केले आहेत. पार्किंगची निविदा खोळंबली आहे. अवैध होर्डिंगमुळे शहर सौंदर्यीकरणाची वाट लागली आहे. एलईडी पथदिवे, मोकाट जनावरे-डुकरांची समस्या कायम आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर मसने यांनी दिले असले तरी त्यावर प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.