आठ दिवसांपासून माझोड-गोरेगाव-अकोला रस्ता बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:34+5:302021-07-29T04:19:34+5:30
माझोड: जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अकोला-हिंगणा फाटा-गोरेगाव-माझोड रस्ता गेल्या आठ दिवसांपासून बंद ...
माझोड: जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अकोला-हिंगणा फाटा-गोरेगाव-माझोड रस्ता गेल्या आठ दिवसांपासून बंद पडल्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून केवळ दुचाकीचाच प्रवास सुरू आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
माझोड-अकोला हा पालखी मार्ग म्हणून मंजूर झाला होता. त्यानंतर सरकार बदलले मात्र रस्त्याची दुर्दशा जैसे थे आहे. तसेच या रस्त्यासाठी आंदोलने झाली, संबंधित विभागाला निवेदन देऊन दुरुस्तीची मागणीही करण्यात आली. मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने ते केवळ दिखाव्यापुरतेच ठरले आहे. गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पुलांच्या बाजूस पर्यायी रस्ते खचले आहेत. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. गोरेगाव येथील नागरिक कापशीमार्गे तर कळंबेश्वर येथीन नागरिक लोणीमार्गे अकोल्याला जात आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
----------------
रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्या बंद आहेत. सद्यस्थितीत शाळा सुरू झाल्या असून, रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना जाता येत नसल्याने नुकसान होत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
-जयश्री शेगावकर, सरपंच, गोरेगाव बु.
----------------------------
‘मते मागण्यासाठीच गावात या फक्त!’
माझोड-गोरेगाव-अकोला रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी ‘मते मागण्यापुरतेच गावात या फक्त!’ असे मोठ्या अक्षरात कळंबेश्वरनजीकच्या नालीवर लिहून लोकप्रतिनिधींविषयी संताप व्यक्त केला आहे.
------------------------
गोरेगावमार्गे बंद पडल्याने अकोल्याला जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांसाठी अकोला शहर हे मुख्य बाजारपेठ तसेच सर्व शासकीय कार्यालय अकोल्यात आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
-दिनकर खंडारे, वंचित बहुजन आघाडी, माझोड.
--------------
270721\4920img-20210726-wa0159.jpg
फोटो