हमाल-मापा-यांना मिळणार एक रूपयात जेवण
By admin | Published: July 25, 2015 01:17 AM2015-07-25T01:17:23+5:302015-07-25T01:17:23+5:30
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनोखा उपक्रम.
खामगाव: बळीराजाला केवळ एक रुपयात जेवण देण्याचा अनोखा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राबवित आहे. राज्यातील एकमेव असलेला पथदश्री प्रकल्प आता हमाल-व्यापार्यांसाठीही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकर्यांप्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-मापार्यांना अल्पदरात भोजन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खामगाव कृउबा समितीच्यावतीने शेतकर्यांच्यासाठी बाजार समितीच्या एक रुपयांत जेवण या उपक्रम १४ ऑगस्ट २0१३ रोजी केले. बाजार समितीत माल विक्रीसाठी येणार्या प्रत्येक शेतकर्याला स्व. सुलोचनादेवी सानंदा शिदोरी गृहात जेवणाचे कुपन अडत्या देतो. अडत्याकडून कुपन घेतल्यानंतर शिदोरी गृहात एका रुपयात शेतकर्याला जेवणाची परवानगी दिली जाते. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक अडत्याला कुपन देण्यात आले आहे. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शेतकर्यांना या शिदोरी गृहात जेवण मिळते. यामध्ये पोळी, भाजी, मसाले भात, शिरा आदी मेनू असून, दररोज विविध भाज्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बाजाराच्या दिवशी म्हणजेच गुरूवारी पातोडीची भाजी आणि शिरा हा विशेष मेनू दिल्या जातो. त्याचप्रमाणे उर्वरित दिवशी कधी कोबीची भाजी, वांगी, चना मसाला, आलू वाटाणे आदी भाज्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांना एका रुपयात पोटभर जेवणाचा अनोखा उपक्रम खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर आता कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल आणि मापार्यांना एक रुपयात जेवण मिळणार आहे.