अकोला जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांच्या अवैध उत्खननाचे मोजमाप सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:54 PM2020-06-03T16:54:19+5:302020-06-03T16:54:27+5:30
अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत गठित पाच पथके २ जून रोजी अकोल्यात दाखल झाली.
अकोला : जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांमधील अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पाच पथकांमार्फत वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप मंगळवारपासून करण्यात आले आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या संमतीने जिल्ह्यात वाळूघाटांमधील वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आल्याची तक्रार करीत, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी गत ३ मार्च रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यानुसार यासंदर्भात स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचा आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना दिला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या २९ मे रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांच्या ठिकाणी अवैध उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी अमरावती येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे पाच सर्व्हेअर व तलाठ्यांचा समावेश असलेली पाच पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील वाळूघाटांमधील अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत गठित पाच पथके २ जून रोजी अकोल्यात दाखल झाली असून, या पथकामार्फत जिल्ह्यात ११४ वाळूघाटांमधील अवैध उत्खननाचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे.