उपाययोजना कागदावर; ग्रामस्थ ‘झ-या’वर!
By admin | Published: April 30, 2016 01:40 AM2016-04-30T01:40:15+5:302016-04-30T01:40:15+5:30
अकोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई : तहान भागविण्यासाठी पायपीट.
अकोला: तळपत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील अकोला तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. खारपाणपट्टा असल्याने पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नाही, नळांना २५ ते २७ दिवस पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यात विविध उपाययोजना मंजूर असल्या, तरी प्रत्यक्षात उपाययोजनांची केवळ १७ कामे पूर्ण झाली आहेत. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कागदावरच असल्याने टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना आटलेल्या नदी-नाल्यांमधील ह्यझर्यांह्णच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे सर्वाधिक चटके खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातील ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. जिल्हय़ात सर्वात मोठय़ा असलेल्या अकोला तालुक्यात १९९ गावांचा समावेश असून, खारपाणपट्टा असल्याने नळ पाणीपुरवठा योजनांद्वारे गावांना पाणीपुरठा केला जातो. परंतु, आटलेले नदी-नाले आणि धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने, गावांमधील नळांचे पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून गत सप्टेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने महान धरणातील पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून ६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र या योजनेची जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने पाणीपुरवठा करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.