बंद उपकरणांमुळे वैद्यकीय तपासण्या खोळंबल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:51 PM2019-11-24T13:51:29+5:302019-11-24T13:51:36+5:30
रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये दाखविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत काही दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याने शेकडो रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या खोळंबल्या आहेत. सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये दाखविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने जिल्ह्यातील गरीब रुग्णांना प्रभावी उपचार मिळावा, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत; परंतु गत काही दिवसांपासून यातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे लागोपाठ बंद पडत आहेत. सोनोग्राफी, डायलिसिस, ईईजीनंतर आता सीटी स्कॅन मशीनही बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. येथे डॉक्टरांकडून उपचार तर होतो; परंतु सीटी स्कॅन, डायलिसिस, सोनोग्राफीसारख्या वैद्यकीय तपासण्यांसाठी रुग्णांना खासगीत रेफर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. रुग्णांना महागड्या वैद्यकीय तपासण्या खासगीत कराव्या लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.
औषधीही घ्यावी लागताहेत विकत
वैद्यकीय उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने महत्त्वाच्या सेवा बंद पडल्या आहेत. दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना औषधी खासगी मेडिकलवरून खरेदी करावी लागत आहेत. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गरिबांचा उपचार महागला आहे.
तांत्रिक कारणांमुळे वैद्यकीय उपकरणांमध्ये बिघाड आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे प्रयत्न सुरू असून, दोन वैद्यकीय उपकरणांची हापकीनकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच वैद्यकीय यंत्रणा पूर्ववत सुरू होईल.
- डॉ. शिवहरी घोरपडे,
अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.