ग्रामीण भागात वैद्यकीय सयंत्र उपलब्ध होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:21 PM2020-01-08T14:21:05+5:302020-01-08T14:21:10+5:30
ग्रामीण भागातील संस्थांमध्ये आवश्यक वैद्यकीय सयंत्रांची मागणी करावी, जिल्हा स्तरावरून पुरवठा करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामीण भागातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सयंत्र नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. आवश्यक सेवा गरजेच्या वेळी मिळत नाही. ही मोठी समस्या असून, ती तातडीने निकाली काढण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक वैद्यकीय सयंत्र उपलब्ध करून दिले जातील, त्यासाठी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यासाठी मंगळवारपर्यंत माहिती सादर करण्याचे सांगण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पथकाकडून ११ ते १८ आॅक्टोबर दरम्यान ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ग्रामस्थांना आरोग्य सोयी-सुविधांच्या दर्जापासून ते प्रशासकीय कामकाज, निवासस्थान, इमारती, मूलभूत सोयी, रुग्णसेवा, दर्जा, विविध संदर्भसेवा, औषधोपचार, तत्काळ उपचार, रुग्ण वाहतुकीची सोय, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा, सेवेतील त्रुटींसह १०७ मुद्यांची तपासणी पथकांनी केली. त्यामध्ये आरोग्य सेवेतील बºयाच त्रुटी पुढे आल्या होत्या. आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी अनेक बाबींची आवश्यकता असल्याचेही निदर्शनास आले होते. त्या सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीण भागातील संस्थांमध्ये आवश्यक वैद्यकीय सयंत्रांची मागणी करावी, जिल्हा स्तरावरून पुरवठा करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी माहिती मागविण्यात आली.
तीन केंद्रांची पुन्हा तपासणी
तपासणीच्या वेळी आरोग्य यंत्रणेचे अभिलेखे उपलब्ध नव्हते. तसेच केंद्रात सुधारणा करण्यासाठी कोणतीही चर्चा तपासणी पथकाला करता आली नाही. पूर्वसूचना दिल्यानंतरही संबंधित माहिती तयार न ठेवणे, यासाठी तीनही वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याचा खुलासा तालुका आरोग्य अधिकाºयांच्या अभिप्रायासह सात दिवसांत सादर करण्याचेही बजावले होते. विशेष म्हणजे, तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांना डिसेंबरमध्ये पुन्हा भेट देण्याचेही ठरले होते.