मेडिकलच्या कामगिरीचे होणार पोस्टमॉर्टेम!
By admin | Published: June 5, 2015 11:47 PM2015-06-05T23:47:11+5:302015-06-06T01:48:51+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कर्मचा-यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचे दिले आदेश.
अकोला : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रिक्त पदे, यंत्रसामग्रीची कमतरता, निधीची गरज, पीजीचा मुद्दा आदी विषयांना बाजूला सारून कर्मचारी, अधिकार्यांच्या कामाचे मूल्यमापन करा. त्यानंतरच कुठे कोणत्या बाबींची गरज आहे हे आपण पाहू, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना ठणकावले आणि आधी मेडिकलच्या कामगिरीचे पोस्टमॉर्टेम करा, असे आदेश त्यांनी दिले. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली व प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते व विविध विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली. यावेळी जिलचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, भाजपचे विभाग संघटनमंत्री डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, किशोर मांगटे पाटील, दीपक मायी उपस्थित होते. प्रभारी अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयासंबधी अडचणी विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या; परंतु तावडे यांनी त्यांच्या मुद्दय़ाला बाजूला सारून महाविद्यालय आणि रुग्णालय या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि रुग्णसेवेबाबत नेहमी चर्चा होते; परंतु या दोन्हींना महत्त्व दिले गेले पाहिजे. महाविद्यालय व रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ नसल्याने कामे होत नाहीत. हे बाजूला ठेवा आणि येथील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी काय काम करतो, याचे आधी मूल्यमापन करा. मूल्यमापन केल्यानंतरच कर्मचारी, अधिकारी, परिचारिकांची पदे भरणे आवश्यक आहेत का, याचा विचार होईल. असे सांगत तावडे यांनी येथील कामाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले.
*वैद्यकीय शिक्षणाचे बजेट ३४0 कोटींचे
वैद्यकीय शिक्षणासाठीचे बजेट केवळ ३४0 कोटी रुपयांचे असल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील जागा भरणे, निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने स्थानिक निधीचा वापर करावा; मात्र अत्यावश्यक गरजांना प्राधान्य दिले जाईल. कामाचे नियोजन करून आणि वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये समन्वय राखूनच आपल्याला सुधारणा करावी लागणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.