पालकमंत्र्यांनी मुंबईत बोलाविली बैठक
By admin | Published: July 7, 2015 01:43 AM2015-07-07T01:43:00+5:302015-07-07T01:43:00+5:30
महापौर-उपमहापौर, आयुक्त राहणार उपस्थित.
अकोला: शहर विकासाच्या रखडलेल्या मुद्यांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात मंगळवारी महापौर, उपमहापौर तसेच आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मजीप्रासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. सद्यस्थितीत संपूर्ण जिल्हा भाजपच्या ताब्यात आहे. योगायोगाने राज्याचे नगर विकास राज्यमंत्री तसेच पालकमंत्रीसुद्धा अकोल्याचे रहिवासी आहेत. मनपातील भ्रष्ट कारभार व अधिकार्यांच्या मनमानीमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होत असताना अशा अधिकार्यांची उचलबांगडी करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. साहजिकच, त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. शहर विकासाचे अनेक विषय शासन दरबारी प्रलंबित आहेत. यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या तांत्रिक मंजुरीचा प्रस्ताव, स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल), शहरातील पाइपलाइन बदलणे आदींचा समावेश आहे. संबंधित विषयावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. याकरिता महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आयुक्त सोमनाथ शेटे सोमवारी मुंबईकडे रवाना झाले.