रस्ते अपघात रोखण्यासाठी मनपा-पोलीस प्रशासनाची घेणार बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:32 PM2020-02-22T13:32:50+5:302020-02-22T13:33:04+5:30
लवकरच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहेत.
अकोला : शहरातील रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यासह करावयाच्या उपाययोजनांच्या मुद्यावर लवकरच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अकोला शहरातील अपघाताच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बसस्थानक चौक, टॉवर चौकासह सर्वच चौकांच्या ठिकाणी वाहतूक सिग्नल लावण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्यांची कामे सुरू असलेल्या भागात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यासह करावयाच्या उपाययोजनांच्या मुद्यावर मनपा, पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन भागातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
अकोला शहरातील रस्ते अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या लहान मुलांना दुचाकी वाहन चालविण्यास देऊ नये, तसेच वाहतुकीची वर्दळ असलेल्या शहरातील रस्त्यांवर दुचाकी वाहनांसाठी वेगळा रस्ता (लेन) असावी आणि कानाला मोबाइल लावून वाहनधारक वाहन चालविणार नाही, यासंदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
-डॉ. सुभाष पवार,
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद अकोला.